कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
कराड/प्रतिनीधी : पुणे-बेंगलोर महामार्ग सहापदरीकरणासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते व तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये, कोल्हापूर-रत्नागिरी चौपदरीकरण, आजरा-आंबोली-संकेश्वर, कळे-कोल्हापूर यांसह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सात मार्गांचे एकूण ३३०.८० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरु होणार आहेत. या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर या तिन्ही जिल्ह्यातील प्रवास सुखकर होणार आहे. महापुरामुळे अनेकदा पुणे-बेंगलोर महामार्ग पाण्याखाली जातो, या पार्श्वभूमीवर मा. गडकरी साहेबांना कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी भेटून निवेदन दिले असून याबाबत केंद्रीय पथकासोबत कोल्हापूरमध्ये लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.याबाबाबत सुचविलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करून पुन्हा हा महामार्ग पुरामुळे किंवा अन्य कारणांमुळे बंद होणार नाही, यापद्धतीने पुनर्रचना करण्याची ग्वाही मा. गडकरी यांनी यावेळी दिली आहे, याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच, कोल्हापूर-पुणे दोन्ही शहरे मेट्रोने जोडण्याच्या मा. गडकरीजींच्या निर्णयाचे स्वागत करतो असे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे.यावेळी, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, खा. श्रीनिवास पाटील, खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, खा. संजय काका पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आम.पृथ्वीराज चव्हाण तसेच तिन्ही जिल्ह्यातील सर्व आमदार व अन्य मान्यवर उपस्थित होते.