पंतप्रधान मोदींनी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण करण्याची गरज – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
सेनापती कापशी येथे तालुकास्तरीय कोरोना आढावा बैठक
सेनापती कापशी/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे व्यापक राष्ट्रीय धोरण तयार करण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. येत्या सहा महिन्यांच्या आत प्रत्येक नागरिकाला लस मिळेल याचे नियोजन करा, असेही ते म्हणाले
सेनापती कापशी ता. कागल येथे कोरोना आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी सेंट झेवियर स्कूलच्या २००६ सालच्या तुकडी माजी विद्यार्थी हर्षवर्धन जयवंतराव पाटील (कासारीकर) व त्यांच्या मित्रपरिवाराने वीस लाख रुपये खर्चून ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर कोविड केअर केंद्रांना दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाचा हा विषाणू सातत्याने बदलणारा आणि धोक्याची तीव्रता वाढवणार आहे. केंद्र सरकार पुढे येणार नाही तोपर्यंत लसीकरणाचा प्रश्न सुटणारच नाही. याला आंतरराष्ट्रीय कंपन्या दाद देणारच नाहीत. राज्या राज्याला जरी परवानगी दिली, तरी या कंपन्या राज्या बरोबर बोलायला तयारच नाहीत. यासाठी एक सुसूत्र धोरण करुन सहा महिन्यात १३० कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण कसे होईल याची दक्षता ही केंद्र सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. लोक पैसे द्यायला तयार आहेत. अनेक कारखानदार मला भेटले ते आपल्या पैशाने आपल्या कामगारांचे लसीकरण करण्यास तयार आहेत. जर ही लस उपलब्ध करून बाजारात दिली. आपण सरकारी दवाखान्यात येणाऱ्या गरीब लोकांना मोफत आणि बाहेर लस घेणाऱ्याला पैसे घेऊन दिली, तर मला वाटते सरकारचा पैसा वाचेल आणि लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होईल.
बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी हेमंत निकम, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, पीडब्ल्यूडीचे प्रभारी उपअभियंता डी. व्ही. शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, गटशिक्षण अधिकारी डॉ. जी. बी कमळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, यांच्यासह सरपंच सौ. श्रद्धा कोळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जि प सदस्य सौ. शिल्पाताई खोत, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर, शशिकांत खोत, प्रवीण काळबर, प्रदीप चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत सुनिल चौगुले यांनी केले.
चौकट
हे चित्र चिंताजनक…..
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाची महामारी वाढतच असताना आम्ही सर्वजन हात जोडून, पाया पडून सांगत होतो की, लक्षणे दिसताच दवाखान्यात या आणि तपासणी करून घ्या तसेच कुटुंबियांपासून अलग राहा तरच आपण कुटुंबीयांसह समाजालाही वाचवू शकू, परंतु अद्यापही तसं होताना दिसत नाही. अनेक जण मला काय होतंय ? अशा विचाराने हा आजार अंगावर काढत आहेत. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाला आणि पर्यायाने समाजालाही भोगावा लागत आहे.