डाॅ. अल्पना चौगुले यांनी रेखाटलेले जलरंगातील शिवस्वराज्य सोहळ्याचे चित्र प्रेरणादायी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डाॅ. अल्पना सोपान चौगुले यांनी जलरंगातील शिवस्वराज्य दिनाचे चित्र रेखाटले आहे. हे चित्र बहुजनांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. शनिवारी सकाळी डाॅ. अल्पना सोपान चौगुले, डाॅ. सोपान रामचंद्र चौगुले व शिवप्रेमी संभाजीराव चेंडके यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेटून चित्र त्यांना प्रदान केले.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक आहेत. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य यामुळेच खऱ्या अर्थाने जीवन परिपूर्ण होईल. लोकसेवेचा हा वस्तुपाठ कार्यकर्त्यांनी स्वीकारावा. डाॅ. अल्पना चौगुले म्हणाल्या, सहा जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. शिवस्वराज्य दिनाचा हा महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय समस्त समाजासाठी प्रेरणादायी असाच आहे. त्यांच्या या निर्णयात आपलेही थोडेफार योगदान व्हावे, या भावनेतूनच मास्टरपीस चित्र रेखाटले आहे. व्यवसायाने डॉक्टर असूनही छंद म्हणून चित्रकलेची आवड जोपासली आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नितीन दिंडे, नेताजीराव मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट –
*शिवस्वराज्य दिनाच्या मंगलमय सोहळ्यात महिलाही उपस्थित असतील, असा विचार करून मी हे चित्र रेखाटले आहे. कोणत्याही चित्राचे अगर छायाचित्राचे अनुकरण केलेले नाही. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जनता आणि मावळ्यांशी संवाद साधत आहेत, असे भाव दर्शवले आहेत. इतिहासाला धरून व इतिहासाचा अभ्यास करून इतिहास संशोधक जयसिंगराव पवार व इंद्रजीत सावंत यांनी प्रेरणा दिल्यानंतर या चित्राच्या दोन हजार प्रती तयार करून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रदान केले.