संजीवनी अभियानाअंतर्गत सुधाकर जोशीनगर येथे सर्व्हेक्षणाच्या ठिकाणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट
व्याधीग्रस्त २९ नागरीकांपैकी १ पॉझिटिव्ह व २८ निगेटिव्ह
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्यावतीने मंगळवारी सुधाकर जोशी नगरात सर्व्हेक्षणामध्ये व्याधीग्रस्त नागरीकांची वॉक टेस्ट, स्वॅब घेण्याचे काम सुरु होते. या भागातील जेष्ठ नागरीकांनी सर्व्हेक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नसलेचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना समजले. त्यामुळे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे या स्वत: सुधाकर जोशी नगरात जाऊन नागरीकांना महापालिका आपल्या सुरक्षितेसाठी वॉक टेस्ट व स्वॅब घेत आहे. तुमच्या आरोग्यासाठीच ही मोहिम आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले. सर्व्हेमध्ये आढळलेल्या संशयीत रुग्णावर तातडीने औषधोउपचार, हॉस्पीटलची सुविधा देता येईल हा या मोहिमेचा उद्देश आहे. उपचार लवकर झालेस कोणताही रुग्ण गंभीर होणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यानंतर नागरीकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला. महापालिकेच्या वतीने १६ ते २३ मे या कालावधीत शहरामध्ये “संजीवनी अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील व्याधीग्रस्त व्यक्तिंना लक्षणे येण्यापुर्वी व कोवीडचे सक्रंमण होण्यापुर्वी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. लक्षणे आढळलेल्या नागरीकांना २४ ते ४८ तासात ॲडमिट केले जाणार आहे. यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या सर्व्हेमध्ये नागरीकांची वॉकटेस्ट घेऊन आलेल्या निर्ष्कषावर वैद्यकिय उपचार केले जात आहे. या अभियानामध्ये शहरातील कोवीडचा संसर्ग जास्त असलेल्या भागात अधिक लक्ष दिले जात आहे.
१८५० जणांची तपासणी एक पॉझिटिव्ह
महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या संवेदनशील भागामध्ये मंगळवारी महापालिकेच्या ७५ वैद्यकिय पथकाद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये संभाजीनगर, जोशीनगर, प्रतिभानगर, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, वारकर कॉलनी, कवडे गल्ली, लाईन बझार, धनगर गल्ली, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, महाडीक माळ, बालाजी पार्क, म्हाडा कॉलनी, चिंतामणी पार्क, श्रीकृष्ण पार्क, खाटिक गल्ली, शिवाजी पुतळा, आझाद गल्ली, हुजुर गल्ली, राजाराम रोड, वाल्मिकी, आंबेडकरनगर येथील २०४४ व्याधीग्रस्त नागरीकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यावेळी १८५० व्याधीग्रस्त नागरीकांची वॉक टेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोवीड सदृश्य लक्षणे असणारे ६० नागरीक आढळून आले. त्याचबरोबर २९५ नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये २९ जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यापैकी छ.शिवाजी महाराज पुतळा परिसरातील १ पॉझिटिव्ह व २८ निगेटिव्ह आले. तर उर्वरीत २६६ जणांचे आरटीपीसीआर तपासणी केली आहे. आयसोलेशमधील ऑक्सीजन प्लॅन्टचे काम तातडीने पुर्ण करा
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी आयसोलेशन हॉस्पीटल येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सीजन प्लॅन्टच्या सिव्हिल वर्कची पाहणी केली. याठिकाणी ऑक्सीजन प्लॅन्टसाठी सिव्हील वर्कचे, इलेक्ट्रीकचे काम व जनरेटरच्या रुमचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना शहर अभियंता नारायण भोसले यांना दिल्या.
यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, साथरोग अधिकारी डॉ.रमेश जाधव, वैद्यकिय अधिकारी डॉ. भिसे, सहा.विद्युत अभियंता चेतन लायकर, पाणी पट्टी अधिक्षक प्रशांत पंडत आदी उपस्थित होते.