६० वर्षापुढील व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर, दि. १८ (जिल्हा माहिती
कार्यालय) : गावातील ६० वर्षापुढील सर्व व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. त्याचबरोबर ४५ ते ६० या वयोगटातील व्याधीग्रस्तांचेही लसीकरण पूर्ण होईल याबाबत लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील लसीकरण कामकाजाचा आढावा संदर्भात जिल्हा कृतीदल समितीची बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठता डॉ. एस. एस. मोरे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते.
लसीकरणचे नोडल अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, दिव्यांग, ग्राम समिती मधील सक्रीय सदस्य, रेस्क्यू फोर्स मधील फ्रंटलाईन वर्कर, बाल कल्याण संकूल गृहातील कर्मचारी त्याचबरोबर कोव्हिड काळजी केंद्रामधील आरोग्य सेवक यांचेही लसीकरण करावे. गावामधील ६० वर्षापुढील एकही व्यक्ती विना लसीकरण राहणार नाही याची दक्षता घेऊन १०० टक्के त्यांचे लसीकरण पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.