लॉकडाऊन लावण्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत सविस्तर चर्चा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाबाबतची परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत विडिओ कॉन्फरसिंग द्वारे आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यासोबतच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने पसरत असून ती अधिक प्रभावी आहे. ही लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय सुविधा वाढविण्यात आल्या असून तिसऱ्या लाटेसाठीसुद्धा आपण सज्ज होत आहोत.
‘मिशन ऑक्सीजन’ अंतर्गत एकूण चौदा नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प येत्या ५० दिवसात पूर्ण होतील. यातून भविष्यातील ऑक्सिजनची सोय होणार आहे. या प्रस्तावित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मधून २३ मे. टन अधिकचा ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या १०० वरून ४०० वर पोहचली आहे.
माझी सर्व कोल्हापूरकरांना नम्र विनंती आहे, कोरोनाचे लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोनाचे लक्षण दिसल्यास रूग्णाला तत्काळ उपचार मिळणं आवश्यक आहे पण अगदी शेवटच्या क्षणाला रूग्ण उपचारासाठी येत असल्याने कोल्हापुरातील मृत्यूदर वाढत आहे. परंतु, यावरही ठोस उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा पोहचू नये याची दक्षता घेण्यासाठी शहरातील बालरोग तज्ज्ञ संघटनेशी चर्चा करण्यात आली आहे त्यानुसार सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी या प्रयत्नांसोबतच आपल्या सर्वांची साथ हवी आहे. मला खात्री आहे, आपण सर्वजण मिळून कोल्हापूरला लवकरच कोरोनामुक्त करू. यावेळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरूण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.