लोकांच्या प्रतिसादामुळे कोल्हापूर दक्षिणमधून दोनलाख शेणी दान – आ.ऋतुराज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणी दान कराव्या, या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून यामुळे कोल्हापूर दक्षिण मधून एक लाख ऐवजी दोन लाख शेणी दान केल्या जातील , असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात आ. पाटील यांच्या हस्ते आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे दक्षिणमधील लोकसहभागातून जमलेल्या ८६ हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
पंचगंगा स्मशानभूमी मध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार होत असून यासाठी जादा प्रमाणात शेणी लागतात. शेणी पुरवठादारांकडून शेणी विकत घ्यायचे म्हटले तरी सुद्धा आवश्यक त्या प्रमाणात शेणी उपलब्ध होत नाहीत, असे चित्र आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मधील सर्व सरपंचांना पत्र पाठवून शेणी दान करण्याचे आवाहन केले होते. पक्ष तसेच गट-तट बाजूला ठेवून या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती आमदार पाटील यांनी केली होती .
आमदार पाटील यांच्या या आवाहनास दक्षिण मधील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. आ. पाटील यांनी १ लाख शेणी देण्याचे जाहीर केले होते पण लोकांच्या प्रतिसादामुळे किमान दोन लाख शेणी दान केल्या जाणार आहेत.दक्षिण मतदार संघातील ३५ गावांमधील पहिल्या टप्प्यात सांगवडेवाडी, नंदगाव, खेबवडे, गिरगांव, इस्पूर्ली, न्यू वाडदे वसाहत, पाचगांव, नेर्ली, द-याचे वडगांव, गांधीनगर , , तामगांव, नागाव उजळाईवाडी या गावातील कार्यकर्ते ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनातून शेणी घेऊन आले होते.आ.पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर अवघ्या दोन दिवसात लोकांनी या शेणी दान दिल्या आहेत.
आमदार ऋतुराज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते , गोकुळचे नूतन संचालक प्रकाश पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती मिनाक्षी पाटील , करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे ८६ हजार शेणी सुपूर्द केल्या. आ. पाटील यांनी संकटकाळी राबविलेल्या या उपक्रमाचं आयुक्त बलकवडे यांनी कौतुक केलं.
चौकट
संकटकाळात माणुसकी जपली
कोरोनाच्या या काळात दक्षिणच्या जनतेने माणुसकी जपली. कोरोना महामारीच्या या काळात जिथं अडचणीची परिस्थिती उद्भवेल त्या ठिकाणी पाटील कुटुंबिय आणि कार्यकर्ते कोरोना विरुध्द लढतील..दोन लाख पैकी उर्वरित शेणी पुढील दोन दिवसात टप्प्या टप्प्याने जमा केल्या जाणार आहेत , असा विश्वास ही आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.