आमचं ठरलंय गोकुळ उरलय म्हणत ३० वर्षाची सत्तारूढ आघाडीची सत्ता संपुष्टात गोकुळवर सतेज पाटील ,हसन मुश्रीफ यांची सत्ता
१७ जागांवर विजय, सत्तारूढ आघाडीला ४ जागा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाले असून आमचं ठरलंय गोकुळ उरलाय असे म्हणत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ जागापैकी १७ जागांवर विजय खेचून आणला. तर गोकुळ जपलं पाहिजे; गोकुळ टिकलं पाहिजे अशी साद सत्तारुढ राजर्षी शाहू आघाडीने दिली होती. मात्र त्यांना ४ जागांवर समाधान मानावे लागले. एकंदरीत गोकुळचा निकाल हा धक्कादायक असून सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षण करावयास लावणारा आहे. असेच म्हणावे लागणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या ईर्षेने मतदान झाले होते. आज मंगळवारी झालेल्या मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेल्या गोकुळची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेत राहिली. कोरोनाची पार्श्वभूमी आणि न्यायालयातील याचिका यामुळे निवडणूकीतवर चांगलाच प्रभाव पडला. सत्ताधाऱ्यांचा दावा आणि विरोधकांचे प्रतिदावे यामुळे मत मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीत चित्र पालटणार का हा औत्सुक्याचा विषय होता. आणि मतदारांनी ते करून दाखवले असेच म्हणावे लागणार आहे.
गोकुळच्या सत्तेसाठी गेली दोन महिने रणधुमाळी सुरू होती.माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी.एन. पाटील यांची सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व पालकमंत्री सतेज पाटील व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये काट्याची टक्कर पहावयास मिळाली. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. तर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. विजयासाठी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी कंबर कसली होती. रमणमळा बहुउद्देशीय हॉलमध्ये ही मतमोजणी झाली. येथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे विजयी उमेदवार : – कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, अरूण डोंगळे, नंदकुमार देंगे, अभिजित तायशेटे, अजित नरके, विश्वास पाटील, प्रकाश पाटील, रणजित कृष्णराव पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील, नविद मुश्रीफ, अंजना रेडेकर, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, अमरसिंह पाटील आदी आहेत तर
सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे विजयी उमेदवार: – शौमिका महाडिक, अंबरिशसिंह घाटगे, चेतन नरके, बाळासाहेब खाडे आदी आहेत.