शिस्तबद्धपणे सर्वांनीच लसीकरण करून घ्या – ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
लसीकरणावेळी गर्दी करून कोरोना संसर्ग वाढवू नका
कागल/प्रतिनिधी : लसीकरणाला अजिबात घाबरू नका. सर्वांनीच शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करून घ्या. लसीकरणावेळी गर्दी करून संसर्ग वाढवू नका, असे आवाहन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, लसीकरणाच्या मोहिमेची सुरुवात झाल्यावर पहिल्या टप्प्यात नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. लसीकरणाबाबत भीती, गैरसमज, अफवा अशी अनेक कारणे होती. परंतु; आता सर्वांच्याच लक्षात आलं आहे की लसीकरणामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. एक मे पासून १८ वर्षावरील सर्वांनाच सरकार लसीकरण करणार आहे त्यावेळी गोंधळ, घाई-गडबड व गर्दी करून कोरोना संसर्ग वाढवू नका, असे आवाहनही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले. लसीकरणाबाबत जनजागृती वाढून जनतेतील भीती, अफवा आणि गैरसमज दूर झाल्याचेही, ते पुढे म्हणाले.यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. सुनीता पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.