विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाला आंतरराष्ट्रीय प्रकल्पामधून १.२० कोटीचे अर्थसाह्य
कोल्हापूर/ प्रतिनिधी : युरोपियन युनियनच्या‘इरॅस्मस प्लस’या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाला १ कोटी २० लाख रुपयांचे अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. ही माहिती प्रकल्प समन्वयक डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी आज येथे दिली.
डॉ. पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र अधिविभाग‘युरोपियन युनियन’च्या ‘इरॅस्मस प्लस’अर्थसहाय्यित प्रकल्पामध्ये काम करीत आहे. या प्रकल्पाचे शीर्षक “मिटिगेट द इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ऑन इंडियन सोसायटी: एज्युकेशन रिफॉर्म फॉर फ्युचर अँड इन सर्व्हिस स्कूल टीचर्स” असे आहे. प्रकल्पाचे मुख्य समन्वयक पंजाबमधील चित्कारा विद्यापीठ आहे. या मध्ये शिक्षणशास्त्र विभागासह इटली, लेविटिया, फिनलंड, जर्मनी या देशांतील विद्यापीठे व स्कूल भागीदार आहेत.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व सेवांतर्गत शिक्षकांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करणे हा आहे. सदरचा प्रकल्प द्विस्तरीय पद्धतीने काम करणार आहे. १) शालेय विद्यार्थ्यांमध्ये चिकीत्सक, पृथक्करण व सृजनशील विचार कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षकांना तयार करणे व त्यासाठी विविध अध्यापनशास्त्रीय पद्धती, साधने व तंत्रे यांचा युरोपियन व भारतीय सहकाऱ्यांच्या सहाय्याने शोध घेणे; २) या नव्याने शोध घेतलेल्या अध्यापनशास्त्रीय पद्धतीचे भारतीय सामाजिक परिस्थितीमध्ये समायोजन व समवेशन होण्यासाठी अ) शिक्षण प्रशिक्षणाच्या पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. या स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये समावेश करणे व त्यानुसार त्यांना शिक्षण देणे, ब) सेवांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देणे. या दोन्ही स्तरांवरील उद्देश साध्य होण्यासाठी सबलीकरण शिबिरांची मालिका भारतामध्ये व निवडक युरोपियन देशांमध्ये आयोजित करण्याचीही तरतूद यामध्ये आहे.
भारतामधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रमांमध्ये सुधारणा व नवीन पद्धतींचा समावेश करण्यासाठी कॅस्केड प्रतिमानाचा वापर करून एकविसाव्या शतकातील ज्ञान व कौशल्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व सेवांतर्गत शिक्षक यांना सुसज्ज करणे व त्या प्रमाणे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांचा सल्ला घेणे व मार्गदर्शन करणे, या बाबींचा अवलंब करण्यात येणार आहे. सदरचा प्रकल्प येत्या तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षणशास्त्र अधिविभाग आंतरराष्ट्रीय स्तरावरील काम करणार आहेच, शिवाय प्राप्त होणाऱ्या आर्थिक सहाय्याद्वारे विभाग शैक्षणिकदृष्टया अधिक सुसज्ज व सक्षम होईल.
या प्रकल्पासाठी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.