जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा नाही; सात ठिकाणी जनरेटर प्रकल्प नियोजित- जिल्हाधिकारी
कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या जिल्ह्यात कोल्हापूर आॕक्सीजनकडून २५ मे टन, बेल्लारी येथून १२ मे टन लिक्विड ऑक्सिजन, व जिल्हयातील इतर प्रमुख रेफिल्रर कडून वायुरूपात प्राणवायूचा पुरवठा सुरु आहे. याशिवाय पुणे येथील आयनाॕक्स, तायो निप्पोन या मोठ्या कंपन्यांकडून ही लिक्विड प्राणवायूचा थेट पुरवठा होतोय. त्यामुळे सध्या प्राणवायूचा तुटवडा नाही. यासाठी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे विभागातील सर्व जिल्ह्यांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम पूर्ण वेळ कार्यरत आहे. मा. मुख्यमंत्री व मुख्यसचिव यांचे निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात पुढील काळात प्राणवायूची कमतरता भासू नये यासाठी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील धर्तीवर सात ठिकाणी नव्याने आॕक्सीजन जनरेटर व वायू रुपात प्राणवायू सिलेंडर मध्ये भरण्याचे प्रकल्प पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या सूचनेनुसार नियोजित असून, त्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.*
कोल्हापूर येथील कोल्हापूर ऑक्सिजन, जे एस डब्ल्यू बेल्लारी, व पुणे येथील आयोनोक्स, तायो निप्पाॕन , आणि एअर लिक्विड या कंपन्यांकडून व जिल्ह्यातील इतर रिफिलर कडून पुरवठादार प्राणवायू दररोज उचलून शासकीय व खासगी कोव्हीड रुगणालयांना पुरवत आहेत. यासाठी खास अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे व यावर अपर जिल्हाधिकारी किशोर पवार व निवासी उपजिल्हाधिकारी गलंडे यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा समिती पूर्णवेळ कार्यरत आहे. बेल्लारी येथून प्राणवायूचा पुरवठा सुरळीत मिळण्यासाठी हेमंत निकम हे उपजिल्हाधिकारी पूर्ण वेळ बेल्लारी येथे नेमण्यात आलेले आहेत व प्रत्येक टँकर सोबत एक स्वतंत्र पोलीस एस्कॉर्ट पुरवण्यात आलेले आहे। त्यामुळे प्राणवायूची वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे.
भविष्यातही प्राणवायूमध्ये कमतरता भासू नये यासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील धर्तीवर सात ठिकाणी आॕक्सीजन जनरेटर प्रकल्प सिलेंडर्स भरण्याच्या सुविधेसहित अस्थापित करण्यात येत आहेत, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील कोव्हीड काळजी केंद्र, समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र, समर्पित कोव्हीड रुग्णालयांसाठी आणि अत्यावश्यक प्रसंगी वापरासाठी १० लिटर क्षमतेचे अतिरिक्त ३०० आॕक्सीजन काॕन्संट्रेटर खरेदी करण्यात येत आहेत.