शहर काँग्रेसने रक्तदान शिबीराने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली साजरी
कराड/प्रतिनिधी : कोरोना बाधितांची संख्या सगळीकडे वाढत आहे. बाधितांना रक्ताची नितांत गरज असते अश्यावेळी रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याअनुषंगाने कराड शहर काँग्रेसच्या वतीने कराड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक समाज मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन केले गेले. याआधी आ. चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व त्यानंतर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन केले. या रक्तदान शिबिरास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सिद्धार्थ थोरवडे, फारूक पटवेकर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, जावेद शेख, जितेंद्र ओसवाल, रमेश वायदंडे आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, हक्क मिळवून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रक्तदान शिबीर घेऊन साजरी केली जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जरी त्यांची जयंती साधेपणाने साजरी करत असू तरी त्यांचे विचार सर्वदूर पोहचविण्याची गरज आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबीर आयोजित केले आहे हाच उपक्रम कराड शहर काँग्रेसच्या वतीने सुद्धा राबविला गेला आहे. अत्यंत स्तुत्य अश्या या उपक्रमामुळे कोरोना बाधितांना रक्ताची गरज पूर्ण होऊ शकेल. तसेच मी सर्वाना आवाहन करतो कि, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वानी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणात भाग घ्यावा.