महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे माजी फुटबॉल प्रशिक्षक व आदर्श शिक्षक आप्पासाहेब वणिरे यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे माजी फुटबॉल प्रशिक्षक व आदर्श शिक्षक आप्पासाहेब गणपत वणिरे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मराठी व भूगोल विषयाचे तज्ज्ञ शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या संचालकपदी ते सध्या कार्यरत होते. त्यांनी संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. ते १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते, पण त्यांची शेवटपर्यंत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस व महाराष्ट्र हायस्कूलशी नाळ कायम होती.
आप्पासाहेब वणिरे यांचा जन्म हा १२ डिसेंबर १९३४ मध्ये झाला होता. एमएबीड पर्यंत शिक्षण घेतलेल्या वणिरे यांनी अध्यापनाबरोबरच खेळाकडेही विशेष लक्ष होते. संस्थेचे माजी चेअरमन डी. बी. पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते.माजी मुख्याध्यापक आर. डी. आतकिरे, आप्पासाहेब वणिरे व मधुकर सरनाईक यांची घनिष्ठ मैत्री होती. माजी मुख्याध्यापक आर. डी. आतकिरे व आप्पासाहेब वणिरे हे दोघे उत्तम फुटबॉल प्रशिक्षक होते. कोल्हापुरातील अनेक फुटबॉल खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांनी असंख्य खेळाडू घडविले. विद्यार्थ्यांना चांगले वळण लागावे या तळमळीतून ते काम करत. फुटबॉलमध्ये महाराष्ट्र हायस्कूल संघाचा दबदबा निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
वणिरे यांच्या शैक्षणिक कामगिरीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेने १९८० मध्ये त्यांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. राज्य सरकारचा १९९१ मध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’मिळाला होता. कोल्हापूर महापालिकेने २००१ मध्ये ‘कोल्हापूर भूषण’पुरस्कारांनी गौरव केला होता. त्यांचे ‘कवडसा’ या नावांनी आत्मकथनही प्रकाशित झाले आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या वाटचालीवर आधारित ‘बहुजनपर्व’या ग्रंथाचे संपादन व लेखन आप्पासाहेब वणिरे व संपादन साहाय्य प्रा. सी. एम. गायकवाड यांनी केले आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून बोर्डिंगचा (१९२० ते २०१०)जवळपास नऊ दशकाचा इतिहास शब्दबद्ध झाला आहे.
वणिरे यांना दोन दिवसापूर्वी रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.