महाराष्ट्र राज्य सरकारने संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा : भारतीय जनता पार्टीची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात प्रशासनाच्यावतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यासंदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचे फार मोठे संकट दिसत नसतानाही महाराष्ट्र राज्य सरकारने घोषीत केलेल्या रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय ? उष्मा वाढत असताना सर्व सामान्य नागरीक स्वत:च्या घरासाठी लागणारी खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडतात परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी आपल्या प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यातून समाजातील सर्वच घटकातील असंतोष वाढत चालला आहे.
प्रास्ताविक करताना सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी कोल्हापूर शहरातील छोटे व्यवसायीक, फेरीवाले यांची व्यवसायाबद्दल असलेली भूमिका स्पष्ट केली. तसेच अधीच भ्रष्टाचार, बलात्कार, खंडणी वसुली, खून-मारामाऱ्या अशा अनेक बदनामीच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे राज्य सरकार दलदलीमध्ये रुतत चालले असताना व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या रोषाला सामोरे जात असताना या गोष्टी पासून लक्ष विचलित करण्यासाठी संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेत आहेत असेच आम्हाला वाटते.
याप्रसंगी प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य नागरीक, छोटे व्यापारी, फेरीवाले, छोटे-मोठे उद्योग धंदे पुन्हा एकदा उभारी घेत असताना लॉकडाऊनचा आतातायीपणाचा निर्णय घेऊन मा.मुख्यमंत्री यांना काय साध्य करायचे आहे तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संकट वाढत असताना तेथे कडक निर्बध लावण्या ऐवजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यालाच लॉकडाऊनचे चटके सोसण्याचे महापाप मा.मुख्यमंत्री का करत आहेत हे देखील उमजत नाही. एकीकडे मद्याची दुकाने रात्री १० पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देणाऱ्या प्रशासनाने सर्वसामान्यांची उपजीविका चालणाऱ्या व्यवसायांवरच का कुऱ्हाड चालवली आहे असा सवाल उपस्थित केला. गोरगरीब जनतेचा विसर पडलेल्या जनतेचा विचार न करता राज्याने पुन्हा लॉकडाऊन केल्यास समाजातील सर्व घटकांना पॅकेज जाहीर करावी अशी मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर थर्मल चेकिंग, रॅपीड टेस्ट आदी आवश्यक गोष्टींचे प्रयोजन करण्यात यावे असे सांगितले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील राज्य सरकारच्या मनात असणाऱ्या लॉकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रसातळाला नेणाऱ्या या निर्णयाला भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरचा देखील तीव्र विरोध असल्याचे सांगितले. वरील विषया संदर्भात फेरीवाले, छोटे व्यवसायीक, हॉटेल व्यवसायिक यांना महापालिका व पोलीस प्रशासन आपले व्यवसाय ८ वाजताच बंद करण्यास भाग पाडत आहेत. परंतु या व्यवसायिकांची व्यवसायाची वेळ ही सायंकाळी ७ नंतर सुरु होत असल्याने प्रशासनाने अशा व्यवसायिकांना रात्री १० पर्यंत आपला व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. तसेच लॉकडाऊनचा असा चुकीचा निर्णय घेऊन समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्यास व त्यातून कायदा व सुव्यवथा बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाची असेल असे सांगितले.
शिष्टमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, निवेदनाची दखल घेऊन पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासक यांना तात्काळ सूचना देऊन प्रशासनाच्या वतीने रात्री ८ च्या बंदसाठी होणाऱ्या कारवाईवर विचार करून व्यवसायाची वेळ १० पर्यंत होण्यसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष विक्रम राठोड, उद्योग आघाडी अध्यक्ष कालिदास बोरकर, नजीर देसाई, अशोक लोहार, महिला अध्यक्षा गायत्री राऊत, अप्पा लाड, किरण तासगावे, गिरीष साळोखे, प्रवीणसिंह शिंदे, अक्षय निरोखेकर, गिरीश अणवेकर, पौरस बिवते, सुश्नात वराळे, रोहन चव्हाण, राजू राठोड, प्रथमेश मिठारी, अप्पा साळोखे, संग्राम साठम, सुरज खटावकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.