बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबागदार अजिंक्य तर प्रणव पाटीलला उपविजेतेपद
पुण्यातील स्पर्धेसाठी दोघांचीही निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित सोहम खासबागदारने साडेचार गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. तर द्वितीय मानांकित प्रणव पाटीलने ही साडेचार गुण मिळवत उपविजेतेपद पटकाविले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दोघांचेही समान साडेचार गुण झाल्यामुळे सरस टायब्रेकमध्ये पंधरा बक्खोल्झ गुण आधारे सोहमने अजिंक्यपद पटकावले तर साडेतेरा बक्खोल्झ गुण मिळवत प्रणवला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या दोघांची निवड पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे. दोघे कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील. वरद आठल्येचा तिसरा क्रमांक, आयुष महाजनचा चौथा क्रमांक तर सारंग पाटीलचा पाचवा क्रमांक आला या तिघांना राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले आहे.क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे व सुधाकर जमादार यांच्या हस्ते बक्षीसे वितरण झाले. यावेळी पंच भरत चौगुले, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, मनीष मारुलकर व निहाल मुल्ला उपस्थित होते.