पीआय,एपीआय,पोलिस कॉन्स्टेबलला लाखाची लाच घेताना पकडले
पिंपरी/प्रतिनिधी : जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून त्यातील साडेतीन लाख रुपये घेतल्याबद्दल एकाच पोलिस ठाण्यावरील पोलिस निरीक्षक (पीआय), सहाय्यक निरीक्षक (एपीआय़)आणि पोलिस कर्मचारी अशा तिघांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज कामशेत येथे पकडले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.अडीच लाख अगोदर घेतल्यानंतर आज एक लाख घेताना या त्रिकूटाला ताब्यात घेण्यात आले. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार लाचखोर एपीआय हा राष्ट्रपती विजेता आहे. बनावटगिरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना जामीन मिळवून देण्यासाठी या तिघांनी पाच लाख रुपये मागितले होते. त्यातील पहिला अडीच लाखाचा हफ्ता त्यांनी घेतलाही होता. तर, दुसरा हफ्ता घेताना आज ते पकडले गेले.पुणे ग्रामीणमधील कामशेत पोलिस ठाण्याचे प्रमुख तथा पीआय अरविंद चौधरी, एपीआय प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर अशी लाचखोरांची नावे आहेत.बाळासाहेब नेवाळे यांचे नातेवाईक आणि मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती.