समर्पित भावनेने समाजासाठी आणि देशासाठी काम करणाऱ्या माणसांची आज प्रकर्षाने गरज –
करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनने ‘ गौरव पुरस्कार वितरणाचा घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. समाजासाठी आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या माणसांची आज प्रकर्षाने गरज आहे ,असे प्रतिपादन करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी केले. शाहू स्मारक भवन ,कोल्हापूर येथे ‘आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन’ च्या वतीने आम्ही कोल्हापुरी गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले .या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी स्वागत आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनचे अध्यक्ष भारत धोंगडे यांनी केले तर प्रास्ताविक बाबुराव आयवाळे यांनी केले. यावेळी पुढे बोलताना वैभव नावडकर म्हणाले,समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या विधायक कार्याचा आदर्श घेऊन तरुण पिढीने वाटचाल केली पाहिजे .यावेळी आम्ही कोल्हापुरी जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष जोशी सर यांना गौरविण्यात आले. यावेळी प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, नव्या पिढीने व्यवस्था परिवर्तनाची लढाई अधिक ताकतीने लढली पाहिजे. समाजातील वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात अजूनही आणले जात नाही ,ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. अभाव ग्रस्तांच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी फार मोठी चळवळ उभारणे ही काळाची गरज आहे. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नीलोफर आजरेकर म्हणाल्या, समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून काम करणाऱ्यांची दखल समाज नेहमी घेत असतो ,त्यामुळे आपण चांगल्या विचाराने समाजामध्ये सकारात्मक बदलासाठी कार्यरत राहिले पाहिजे. यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर व महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पै.विष्णू जोशीलकर यांना कोल्हापूरी भूषण, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल सदाशिव लांडगे यांना कृषिभूषण,सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अतिग्रे च्या माजी सरपंच सौ.विद्या सूर्यवंशी व सुरेश कसबे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी भरारी फाउंडेशनला रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर वैद्यकीय क्षेत्रातील सेवा कार्याबद्दल डॉक्टर सुप्रिया खन्ना यांना व आदर्श पत्रकार पुरस्कार सतीश सरीकर व सौ. प्रिया सरिकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा प्रकाश नाईक म्हणाले ,माणसातल्या संवेदनशीलतेला जागून खऱ्या अर्थाने विकास आणि सन्मान या पासून वंचित राहिलेल्या समुदायांसाठी सर्वच क्षेत्रातील लोकांनी काम केले पाहिजे. कार्यक्रमास डॉ. अनिल भोसले, राम रानगे, सौ नूतन सकट ,संगीता घाडगे, सौ माधवी धोंगडे, सुरेश कांबळे, अॕड.अशोक घुले, यशवंत सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .आभार प्रदर्शन अरुण घाटगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले.