क्युपोला भट्टीसाठी सीएनजीचा वापर करावा
प्रदूषणाबरोबर पर्यावरणाला मदत – नलिनी नेने
कोल्हापूर/प्रतिनिधी : क्युपोला भट्टीमध्ये दगडी कोळशाऐवजी सीएनजीचा इंधन म्हणून वापर केल्यास प्रदूषणाला आळा घालण्याबरोबर कमी खर्च आणि पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात मदत होईल,असे मत क्युपोला भट्टी विषयातील तज्ज्ञ नलिनी नेने यांनी व्यक्त केले. येथील धातू तंत्र प्रबोधिनीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होते. फौंड्री उद्योगातील बदलणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सद्यःस्थितीमध्ये औद्योगिक वसाहतींमध्ये सीएनजी वायूची होणारी उपलब्धता लक्षात घेऊन त्याचा उपयोग प्रभावीपणे करण्याकरिता धातूंच्या संमिश्राच्या वितळण प्रक्रियेमध्ये इंधन म्हणून वापर करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. वायुआधारित क्युपोला वापरात असून त्यासंदर्भात स्थानिक स्तरावर तंत्रज्ञान विकसित प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. सध्या फौंड्री उद्योगांना कच्च्या मालाची दरवाढ व ग्राहकांकडून मिळणारा दर यामुळे बाजारामध्ये टिकण्याकरिता आव्हाने निर्माण झालेली आहेत. यावर उपाययोजना म्हणून सामायिक सुविधा केंद्रामध्ये सीएनजीवर चालणारी मोठी क्युपोला भट्टी उभारून आवश्यकतेनुसार धातुरस वाहतुकीच्या साहाय्याने जागेवर पोहचवणे शक्य आहे. त्यातून खर्च कमी होऊन उत्पादकता सहजपणे विकसित होईल. क्लस्टर योजनेअंतर्गत एमएसएमईच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्याचे ठरले. दरम्यान,असोसिएशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या धातू तंत्र पत्रिका या मासिकाचे सर्वांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी धातुशास्त्रज्ञ डॉ. निशिकांत तांबट, धातू अभियंते अनंत वैद्य,मोहन पंडित, किशोर मानकर, श्रीधर दंडगे,किर्लोस्कर ऑईल इंजिनचे सोर्सिंग जनरल मॅनेजर सुरेश पाटील,अभिजित कोपार्डे,उद्योजक निखिल दळवी, सूरज महाजन,विनायक कोंडेकर, अड. गीतांजली सावळे, प्रिया जाधव व गिरीश पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शशांक मांडरे,बाबासाहेब खाडे यांनी केले. संदीप जोशी,दिलीप यादव, हर्षवर्धन पावसकर, शिवम भेंडे आदी उपस्थित होते.