भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाकडून उपायुक्त धारेवर
कोल्हापूर/प्रतिनिधी : आगामी महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगर पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाले आहेत. हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात पडलेली आहेत. याबाबत आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन आणि प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना धारेवर धरले
प्रारुप मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळा बद्दल भारतीय जनता पार्टीने गेल्या आठवड्यात उपायुक्त निखील मोरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. परंतु परिस्थिती जैसे थे असल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने माजी नगरसेवक अजित ठाणेकर, चंद्रकांत घाडगे,प्रदीप उलपे सरचिटणीस गणेश देसाई आणि महिला मोर्चा प्रमुख गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेतली व त्यांना वस्तुस्थिती अवगत करून दिली.अजित ठाणेकर यांनी मागील निवेदनातील मागण्यांवर काय केले असा सवाल उपस्थित केला आणि नागरिकांच्या मतदानाचा मुलभूत हक्कावर महानगरपालिका प्रशासन स्वतःच्या चुकीमुळे गदा आणत असल्याचा आरोप केला. तसेच महानगरपालिकेचे अधिकारी सामान्य नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यास तयार नसल्याचे दाखवून दिले. ते म्हणाले “आज प्रभाग क्रमांक ३३ मधील सुमारे एकविसशे नावांबाबत मी हरकत दाखल करावयास गेलो असता उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी हरकती नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना कायदा समजावून सांगितल्यावर त्यांनी हरकती स्विकारल्या. सामान्य नागरिक अधिकाऱ्यांसोबत इतका वाद घालू शकत नाही. त्यामुळे अनेक सामान्य नागरिक हरकती नोंदवू शकणार नाहीत”चंद्रकांत घाटगे यांनी एका प्रभागातील विशिष्ट वस्त्या कोणत्याच प्रभागाच्या मतदार यादीत नसल्याचे दाखवून दिले, तर निलेश पसारे यांनी केवळ आठ ते दहा प्रभागांची रचना बदललेली असताना सर्वच प्रभागांच्या याद्या नव्याने करण्याची कोणतीही गरज नव्हती, २०१५ सालच्या अंतिम याद्या प्रमाण मानून त्यात झालेली वाढ वा घट इतकाच फरक केला असता तर इतक्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाले नसते असे प्रतिपादन केले. अभिजीत शिंदे यांनी सुमारे दोनशे मतदार गेली अनेक वर्षे चुकीच्या मतदारसंघांमध्ये समाविष्ट होत आहेत हे निदर्शनास आणून दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी रविकांत अडसूळ यांना निवेदन दिले व दिनांक १६ रोजी जाहीर झालेल्या प्रारुप मतदार याद्या रद्द कराव्यात पुन्हा नव्याने प्रारूप याद्या तयार कराव्यात आणि त्या यद्यांवर हरकती घेण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा अशी आग्रही मागणी केली,अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही इशाराही दिला.चर्चेला उत्तर देताना उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर घोळ झाल्याचे मान्य केले. तसेच प्रशासनाने कुठल्या प्रभागात किती नावे कमी झाली अथवा वाढली याची यादी काढल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणावर घोळ होण्याचे कारण मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा व महानगरपालिकेच्या सर्व्हेअर्स चा निष्काळजीपणा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आलेल्या सर्व हरकती १००% सोडविल्या जातील आणि महानगरपालिकेने सीमारेषां वरील सर्व मतदारांची छाननी सुरू केल्याचेही सांगितले. उपायुक्तांनी दिलेल्या खुलाशावर समाधान न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा याद्या रद्द कराव्यात अशी आग्रही मागणी केली. त्यावर वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय करू असे अडसूळ यांनी सांगितले.
यावेळी भाजपा गटनेते अजित ठाणेकर, सरचिटणीस गणेश देसाई,
जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, चिटणीस प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, राजाराम नरके, अभिजित शिंदे, अमित टिकले, महादेव बिरंजे, दिनेश पसारे,प्रीतम यादव ई. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.