ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑक्सिजन साठवण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ
गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लजच्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून रुग्णांना दिलासा मिळणार असून ऑक्सीजन टंचाईमुळे होणारी गैरसोय थांबणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो टाकीत साठवून पाईपलाईनने तो रुग्णाला पुरवठा करावयाच्या प्रकल्पाचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना संसर्गाच्या महामारीच्या काळात ऑक्सिजन टंचाईमुळे रुग्ण सेवेमध्ये अडचणी यायच्या.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य युवराज पाटील, नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेश मुतकेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबोळी यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर तांत्रिक माहिती दिली.
चौकट…
या प्रकल्पाविषयी माहिती देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ५० लाख रुपये खर्चाच्या या ऑक्सीजन प्लांटमधून दररोज १०० ते १२० जंबो सिलेंडर भरतील. तिथून तो टाकीत व पाईपलाईनने रुग्णालयात पुरविला जाईल. दोन ड्यूरा सिलेंडरमधून एकूण ४० जंबो सिलेंडर ऑक्सिजन असेल. त्यामधून उच्च दाबाचा ऑक्सिजन पुरवठा मिळेल. तसेच दोन बाय- पॅप ऑपरेटर्सच्या माध्यमातून रुग्णाला कृत्रिमरीत्या ऑक्सीजन देता येणार आहे. हे मशीन वेंटीलेटरला जोडून कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू करता येतो.