कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी,पन्हाळा गावातील शेतकऱ्यांना मुलकी पड जमिनी वाटप कराव्यात व त्यांच्या नावावर सातबारा पत्रकी नोंद करावी संघर्ष समितीची मागणी
कोल्हापूर/ प्रतिनिधी : मरळी तालुका शाहूवाडी गावातील शेतकऱ्यांना शासनाने मूलकीपड जमिनीचे वाटप केले आहे त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी येथील ४४ व पन्हाळा तालुक्यातील ४९ गावातील शेतकऱ्यांना मुलकी पड जमिनीचे वाटप करावे व त्यांच्या नावावर सातबारा पत्रकी नोंद करावी अशी मागणी राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलकिपड संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.या संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पभूधारक गरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांना जमिनीची सातबारा नावावर करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या आदेशानुसार जिल्हा जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शाहुवाडी पन्हाळा तालुक्यातील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले होते.
गेल्या शंभर वर्षाचा व तीन पिढ्या पासून प्रलंबित असणारा विषय अनेक पक्ष व संघटनांनी हाती घेतला होता आमदार विनय कोरे यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना आदेश दिले होते त्यावेळी जिल्ह्यातील करवीर सरकारी मुलकी पड गायरान सरकारी जमीन शासनाने शेतकऱ्यांना वाटप करण्याचा विषय घेण्यास सांगितले होते जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी संपूर्ण जिल्ह्याचा सर्वे करून पहिला मोर्चा १४ ऑक्टोबर २०२० रोजी तहसीलदार कार्यालयावर काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले यावेळी जमिनीचे पुरावे शासनाच्या पुराभिलेख कार्यालयातून जिल्हाधिकारी यांना सादर केले होते. जिल्हाधिकारी यांनी ५ डिसेंबर २०२० रोजी अध्यादेश काढून गावातील शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप केले सदर आदेश जिल्ह्यातील इतर गावांना देखील सादर केले होते जिल्हाधिकारी यांनी या कामासाठी शासकीय कमिटीची तालुका स्तरावर स्थापन केल्या मात्र सद्य स्थितीत या कमिटीतील लोकांना विचारले जात नाही भविष्यात कोणतेही निर्णय मुलकिपड समितीला विचारून घ्यावे अन्यथा शासनाच्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शंकरराव कांबळे, राजाराम कांबळे,पांडुरंग कांबळे,सुनील कांबळे यांनी समितीच्या वतीने दिला आहे.