महाआघाडी सरकारचे महाअपयशी वर्षै–
सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले कुचकामी सरकार – भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
कोल्हापूर (प्रतिनिधी) महिलांवरील वाढते अत्याचार , अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे उदगार भाजपा प्रवक्ते मा.केशव उपाध्ये यांनी काढले.कोल्हापूर येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला नीट बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिरायत शेतीसाठी २५,००० आणि बागायती शेतीसाठी ५०,००० रूपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. फळबागांसाठी एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. सत्तेत आल्यावर आपण काय बोललो होतो , याचा विसर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे.
ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही.तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने ३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पॅकेज जाहीर केले. सामान्य माणसाला भरमसाठ वीज बिले पाठविली गेली आहेत. वीज बिल माफ करण्याचे आश्वासनही या सरकारने पाळले नाही. पत्रकार अर्णब गोस्वामी , अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर केलेल्या कारवाईने आघाडी सरकार सूडबुद्धीने काम करते आहे , हेच दिसले आहे. समाज माध्यमांमधून या सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे.
ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले, या सरकारच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील. घरात बसून राज्यकारभार हाकणारा मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचे दुःख , हालअपेष्टा जाणून घेऊ शकतच नाही. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहाराबाबत आरोप होत आहेत. मात्र मुख्यमंत्री त्याबाबत चकार शब्दही उच्चारण्यास तयार नाहीत. जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या या सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही त्यांनी नमूद केले .शेवटी तीनही घटक पक्षात व यातील पक्षाअंर्तगतही कोणताही समन्वय नसलेले हे सरकार कधीही पडेल , भाजपा काहीच न करता प्रभावी विरोधी पक्ष म्हणून कार्यरत राहील ” असे ही ऊपाध्ये यांनी शेवटी नमूद केले.