एक एक मतदान चिकाटीने नोंदवा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
कागल/प्रतिनिधी : विधान परिषदेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे. त्यामुळे एक एक मत चिकाटीने नोंदवा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्यासह राज्यातील पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात आयोजित पदवीधर व शिक्षकांसह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह पाटील होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात भाजपने कूटनीतीचा अवलंब करीत सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचे कारस्थान केले. महाविकास आघाडीच्या अपमानाचा बदला घेण्याची ही निवडणूक आहे. कोणत्याही परिस्थितीत बारा हजार पोलिस व दहा हजार इतर रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील. शिक्षक, शिक्षण संस्था व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न जसेच्या तसे पडून असून श्री. लाड व श्री. आसगावकर हे दोन्हीही दोघेही सभागृहात आवाज उठवून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.
दलित मित्र प्रा. डी. डी. चौगुले म्हणाले, भाजपचे नेते सोंग काढून सरकारला बदनाम करण्याचा खटाटोप गेल वर्षभर सातत्याने करीत आहेत. या मनुवाद्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून चोख उत्तर देण्यासाठी सज्ज राहा.
यावेळी बाचणीचे माजी सरपंच सूर्यकांत पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री साखर चे संचालक प्रवीणसिंह पाटील, केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचीही भाषणे झाली.
स्वागत शिवानंद माळी यांनी केले. आभार उपनगराध्यक्ष सौरभ पाटील यांनी मानले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह भोसले, जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिनकरराव कोतेकर, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, रमेश तोडकर, रणजीत सुर्यवंशी, अरुण पाटील, आर. व्ही. पाटील, जीवनराव शिंदे, कृष्णात पाटील, रमेश माळी, संजय चितारी, प्रविण काळबर, सतिश घाटगे, आनंदा पसारे, नितीन दिंडे, संजय ठाणेकर, देवानंद पाटील, विवेक लोटे, बाबासाहेब नाईक, रवी परीट आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट…..
ते कोथरूडला पळून गेले…..
प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, पदवीधरांचे आमदार म्हणून चंद्रकांत पाटील सभागृहात गेले. परंतु; त्यांनी पदवीधर आणि शिक्षक आणि शिक्षण संस्थांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच या मतदारसंघातून पुन्हा डाळ शिजणार नाही, या भीतीने चंद्रकांत पाटील कोथरूडला पळून गेले.