सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती
कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाने बेळगाव, भालकी,निपाणी बिदर यांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावीत यांसाठी सर्वोच्च न्यायालयात २९ मार्च २००४ ला खटला प्रविष्ट केला आहे. दुर्दैवाने कोरोनाच्या कालखंडानंतर न्यायालयात होणार्या सुनावणीसाठी महाराष्ट्राचे कुणीही अधिकारी अथवा अधिवक्ता सुनावणीसाठी उपस्थित नसतात. याउलट कर्नाटकचे अधिकारी, अधिवक्ता प्रत्येक वेळी उपस्थित असतात. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल; मात्र सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून तेथे सक्षमपणे बाजू मांडून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रसंगी समितीचे खचिनदार प्रकाशराव मरगाळे, अधिवक्ता एम्.जी. पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.मनोहर किणेकर पुढे म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही या संदर्भातील लढा देत असून समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर ७-८ खटले, तर आमच्यावर २०-२२ खटले आहेत. प्रत्येक आंदोलन झाल्यावर कर्नाटक शासन आमच्यावर खटले नोंद करते. माझ्यावर एका खटल्यात ३०२ सारखी गंभीर कलमेही लावण्यात आली होती. आम्ही मराठी असल्याने आम्हाला कर्नाटक राज्यात चाकरी मिळत नाही. त्यामुळे मराठी युवकांना केवळ केंद्राची सैन्याची चाकरीच केवळ उपलब्ध आहे. त्यासाठी आम्ही यापुढे आता महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत. याचा प्रारंभ आम्ही १७ जानेवारीला हुतात्मा दिवसापासून करणार आहोत. या दिवशी मोठ्या संख्येने जमून आम्ही बेळगाव येथून येऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. यानंतर आंदोलनाची व्याप्ती वाढवत पुढे सांगली, सातारा, पुणे आणि १ मे या दिवशी मुंबईत भव्य आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे.२१ फेब्रुवारी या दिवशी देहली येथे होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या संदर्भात ठराव व्हावा, तसेच भूमिका मांडली जावे, अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भात आम्ही अध्यक्षा तारा भवाळकर यांना भेटलो आहे. य.दी. फडके जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या भाषणात प्रत्येक पृष्ठावर सीमालढ्याविषयी आणि मराठी बांधवांवर होणार्या अन्यायाविषयी मत मांडण्यात आले होते.’’