शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण
कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा
उत्तुर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालय भूमिपूजनासह मौजे सांगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाचेही भूमिपूजन
कागल/प्रतिनिधी : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच, सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचे अनावरण, कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा, उत्तुर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालय भूमिपूजनासह मौजे सांगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाचेही भूमिपूजन होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.रविवार दिनांक ६ रोजी चार वाजता सेनापती कापशी येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
सोमवार दि. ७ रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दुपारी ४ वाजता देशातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय तसेच हॉस्पिटलचा भूमिपूजन, कोनशीला अनावरण उत्तूरमध्ये होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पदवी प्रवेश कार्यक्रम बहिरेवाडी ता. आजरा येथील जे. पी. नाईक हॉलमध्ये होत आहे. तसेच; सायंकाळी ६ वाजता उत्तुर येथील उत्तुर- धामणे रोडवरील एसटी स्टँड बांधकाम व तलाव सुशोभीकरण शुभारंभ व येथील नेहरू चौकात जाहीर सभा होणार आहे.
बुधवार दि. ९ रोजी कोल्हापूर येथील शेंडा पार्कमधील ११०० बेडचे हॉस्पिटल तसेच येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होत आहे. तसेच तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन होणार आहे.गुरुवार दि १० रोजी सायंकाळी ४ वाजता मौजे सांगाव येथील नवोदय विद्यालय शेजारी ग्रामीण सेंटर १०० बेडच्या हॉस्पिटलच्या कामाचा भूमिपूजन, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय शुभारंभ नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती माधुरीताई कानिटकर यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सायंकाळी सात वाजता मौजे सांगाव येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.