शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात सजली आहे.
रावण वधानंतर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला त्याप्रसंगी सकल चराचराला आमंत्रण होते परंतु आपल्यामुळेच रावण वध होऊ शकला तरी सुद्धा आपल्याला आमंत्रण मिळाले नाही याचा राग धरत सेतू मूर्तिमंत रूप घेऊन रामरायाच्या दरबारात आला. त्याने आपला क्रोध बोलून दाखवला व सीतेसारखी सुंदरी मिळाली म्हणून तु मला विसरलास असे उद्गार काढले हे ऐकून सीतामाई रागावल्या आणि त्यांनी सेतूला शाप दिला की पुढे तुझा वध जगदंबेच्या हातून होईल कालांतराने भगवान रामचंद्र नारायणमुनी तर सीता चंद्र वदना या नावाने अंशात्मक अवतार धारण करते झाले. कारण इंद्र आणि तक्षक राजाची कन्या यांचा पुत्र म्हणून सेतुराजा अवतीर्ण झाला होता. सेतू राजाने मला कोणाकडूनही मरण येऊ नये असे वरदान मिळवल्या नंतर तो मदोन्मत्त झाला समस्त चराचराला त्रास देऊ लागला तेव्हा याचा वध होऊ दे असा विचार करून देवांनी नारायण मुनी व त्यांची पत्नी चंद्रवदना हे जेथे तप करत होते त्या परिसरामध्ये राजाला येण्यास भाग पाडले चंद्रवदनेला बघून भाळलेल्या सेतू राजाने तिचे अपहरण केले तेव्हा मला दोन महिन्याचे व्रत आहेत ते पूर्ण झाले की मी तुझ्याशी विवाह करीन असं खोटं सांगून चंद्रवदना त्याच्या कैदेमध्ये राहीली. तिकडे नारायण मुनींनी पत्नीचा शोध करताच ती सापडत नाही म्हटल्यावर श्रीशैल पर्वतावर जाऊन भ्रमरांबिकेचे अनुष्ठान केले. हिंगुलाज भगवती भ्रमरांबिका नारायणावर प्रसन्न झाली व तीने आपल्या उजव्या पायातून शैव शाक्त वैष्णव आणि डाव्या पायातून नादक व बैंदक असे पाच भ्रमर म्हणजे भुंगे प्रगट केले आणि सांगितले की हेच भ्रमर सेतु राजाचा नाश करतील देवीने दिलेल्या माणिक पात्रामध्ये पाची भ्रमरांना य घेऊन नारायण मुनी सन्नतीकडे निघाले देवीने सांगितल्याप्रमाणे तिच्या घोषाचा आवाज त्यांच्या कानावर येत होता पण अचानक हानगुंठ क्षेत्री आल्यावर तो आवाज येईना म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले तर तिथे जगदंबा स्थिर झाली पुढे नारायण मुनींनी सन्नतीत जाऊन सेतू राजाला आपल्या येण्याचा हेतू सांगितला राजा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी पाची भ्रमरांना मुक्त केले त्या भ्रमरांनी असंख्य रूपं घेऊन राजाचा नाश केला व पुन्हा देवीच्या पादुकांमध्ये ते भ्रमर गुप्त झाले नारायण मुनींनी त्या ठिकाणी देवीची उपासना केली देवीने दिलेल्या वरदान प्रमाणे च्या नावाने देवी चंद्रला म्हणून प्रसिद्ध झाली आज गुलबर्गा जिल्ह्यातील सन्नती गावी देवीचे मंदिर आहे. अनेक घराण्याची ती कुलस्वामिनी आहे अशा वैशिष्ट्यपूर्ण चंद्रला परमेश्वरी या रुपात आज करवीर निवासिनी सजली आहे.