कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर
कोल्हापूर, दि. २५ (जिमाका) : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy Rainfall at isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै २०२४ अशी २ दिवस बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दि. २६ व २७ जुलै २०२४ अशी २ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी याबाबत चर्चा केली होती.
जिल्ह्यातील राधानगरी, दुधगंगा, वारणा व तुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या धोका पातळीला वाहत आहेत, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणी येत आहे. याकरीता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ व २७ जुलै २०२४, अशी २ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. तथापी, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे आदेश देण्यात आले आहेत.