योग्य उद्देशानेच यशाचा मार्ग मिळतो – प्रो.उद्धव भोसले
घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
अतिग्रे/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना योग्य उद्देश ठेवणे गरजेचे आहे. ज्या उद्देशाने आपण शिक्षण घेतो तो उद्देशच आपल्याला यशाकडे घेऊन जातो, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.उद्धव भोसले यांनी केले. ते विद्यापीठातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभावेळी बोलत होते.यावेळी त्यांनी विद्यापीठातील अभ्यासक्रमाविषयी, संशोधन क्षेत्रातील प्रगती विषयी माहिती दिली. विद्यापीठातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंबद्दल सांगितले. परदेशी विद्यापीठ व उद्योग क्षेत्राशी घोडावत विद्यापीठाने सामंजस्य करार केले आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०-२० नुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आल्याचे सांगताना विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास व रोजगार निर्मितीवर भर देण्यात आल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व पालकांचे स्वागत करताना विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी आम्ही घेत असल्याची ग्वाही दिली. पालकांनी आपल्या मुलांवर गुंतवणूक करण्याचा सल्ला देताना त्यांनी विद्यार्थ्यांनीही आई-वडिलांच्या कष्टाला विसरू नये असे मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षकांचा आदर, सकारात्मक दृष्टिकोन, उत्तम श्रोते होणे, सातत्याने नव्याने शिकण्याची वृत्ती अंगीकारल्यास यश प्राप्ती होते. विद्यार्थ्यांना विद्यापीठाने उत्तम सोयी सुविधा दिल्या आहेत त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
डीन डॉ. व्ही.व्ही कुलकर्णी यांनी विद्यापीठातील वार्षिक शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच परीक्षा नियंत्रक डॉ. एन.के पाटील यांनी विद्यापीठातील परीक्षा पद्धती व नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी उपस्थित विद्यार्थी,पालक यांचे आभार मानले तर सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी केले. यावेळी डीन डॉ. उत्तम जाधव, डॉ. योगेश्वरी गिरी,प्रा.संजीव कुमार इंगळे सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.