थॅलेसेमिया रुग्णासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट वरदान – डॉ. प्रीती मेहता – डी वाय पाटील हॉस्पिटल येथे थॅलेसेमिया तपासणी शिबीर
कोल्हापूर/प्रतिनिधी : देशात थॅलेसेमिया रुग्णांची संख्या वाढत असून बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे त्यांच्यासाठी वरदान ठरू शकते. मात्र त्यासाठी या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. जेवढ्या कमी वयात हे उपचार करता येतील, तेवढे ते यशस्वी ठरतील असे प्रतिपादन मुंबईच्या एस आर सी सी हॉस्पिटलच्या हेमॅटो – ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रीती मेहता यांनी केले. कदमवाडी येथील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल बालरोग विभाग आणि मुंबईच्या एस आर सी सी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया रुग्णांसाठी आयोजित HLA चाचणी व आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. थॅलेसेमिया म्हणजे काय, त्याची लक्षणे, तपासण्या आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या उपचार पद्धती विषयी त्यांनी पालकाना मार्गदर्शन केले. पालकाच्या विविध शंकांचे यावेळी डॉ. प्रीती मेहता यांनी निरसन केले.
या शिबिरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, अहमदनगर, निपाणी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांचे पालक सहभागी झाले होते. यावेळी मोफत HLA चाचणी करण्यात आली.बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांनी नातेवाईकांना थलेसमिया रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व अद्यावत उपचार मोफत दिले जात असल्याची माहिती दिली. डॉ. प्रीती नाईक यांनी थॅलेसेमिया रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णांची फुफुसाची क्षमता चाचणी करण्यात आली तसेच रेड सेल अँटीबॉडी तपासणी डॉ. सुचिता देशमुख यांनी केली. थॅलेसमिया या रुग्णांमध्ये प्रदीर्घ आजार , वारंवार रक्त चढवावे लागणे, रोजची औषधे, यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य ही बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी हॉस्पिटल मधील मनोरुग्ण विभागाच्या डॉ. स्नेहा हर्षे यांनी त्यांची मानसिक चाचणी केली. डॉ देवयानी कुलकर्णी यांनी आभार मानले.
या शिबिरासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ राकेशकुमार मुदगल यांचे मार्गदर्शन लाभले. अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड, अजित पाटील यांचे सहकार्य लाभले.