भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडलाच्यावतीने दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकल प्रदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : लक्षतीर्थ वसाहत येथील दिव्यांग कॅलेंडर विक्रेता किरण शेटके यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीन चाकी सायकल भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते अर्पण करण्यात आली. आपल्या उदरनिर्वाहासाठी सदर युवक हा शहरात महालक्ष्मी मंदिर परिसरात फिरून कॅलेंडर विकून आपले कुटुंब कसेबसे चालवतो. काही दिवसांपूर्वी अशीच एक सायकल दिव्यांग व्यक्तीस देण्यात आली होती या बातमीचा संदर्भ घेत किरण शेटके यांनी भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्षांकडे सायकल मिळणेची मागणी केली होती. या त्याच्या अर्जाची दखल घेत, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने किरण शेटके या दिव्यांग व्यक्तीस आज लक्षतीर्थ संयुक्त तरुण मंडळ चौक याठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांचे हस्ते तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली. बुधवार दिनांक ०४/११/२०२० रोजी लक्षतीर्थ संयुक्त तरुण मंडळ चौकामध्ये भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडलाचे पदाधिकारी व नागरीकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्ष भरत काळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी लक्षतीर्थ परिसर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून झालेल्या कार्याचा आढावा देत आत्मनिर्भर भारत आणि अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत करणे अपेक्षित असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असे कार्य अखंड सुरु असल्याचे नमूद केले.
लक्षतीर्थ येथील भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस इकबाल हकीम यांनी या कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले. याप्रसंगी बोलताना इकबाल हकीम म्हणाले, लक्षतीर्थ परिसरातील नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा सामाजिक कार्यासाठी सदैव कार्यरत असणार असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, भारतीय जनता पार्टी सातत्याने गरजू लोकांना काहीना काही स्वरूपात मदत करत असते. किरण शेटके यासारख्या दिव्यांग व्यक्तीला सक्षम करण्यासाठी सहकार्य करून एक उद्योजक तयार होत असल्याचे समाधान लाभत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे दिव्यांगाबाबत सुरु असणारे सततचे कार्य लक्षात घेता शहरातील दिव्यांगांना अशा प्रकारची मदत करून रोजगार, व्यवसाय याच्या माध्यमातून त्याचे कुटुंब योग्यरित्या चालण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना दिव्यांग किरण शेटके याने भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे सायकल तत्परतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी किरण शेटके याच्या परिवारातील सदस्य व लक्षतीर्थ येथील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष राजू मोरे, विजय आगरवाल, दिग्विजय कालेकर, नजीर देसाई, प्रसाद मोहिते, सुमित पारखे, प्रतीराज नीकम, लक्षतीर्थ येथील महमद शेख, शिवानी पाटील, संजय पाटील, प्रदीप माने, सतीश जाधव, बाळू चौगुले, समीर अत्तार, योगेश तेली, पैमिदा मुल्ला, तबस्सुम हकीम आदिंसह उत्तरेश्वर पेठ मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.