करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रावणातील पहिल्या गुरुवारनिमित्त शिवसेना नेत्या तथा माजी विधानपरिषद उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आदिशक्तीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवी मातेच्या चरणी विधीवत साडी, नैवेद्य व महाप्रसाद अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी महालक्ष्मी मातेचे मनापासून आभार मानले. आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत आलेल्या विविध सुख-दुःखांच्या प्रसंगांचे स्मरण करत त्यांनी देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेसह महिलांसाठी क्लस्टर, आरोग्यविषयक योजना आणि महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारकडून काम सुरू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.महिला सुरक्षिततेच्या विषयावर आज बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीस पोलीस महानिरीक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही यावेळी घेण्यात आली.
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाचा आढावाही डॉ. गोऱ्हे यांनी घेतला. मंदिरातील जीर्णोद्धाराचे काम लवकर सुरू होऊन ते वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“श्रावणातील पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. देवीच्या चरणी प्रार्थना करून मनामध्ये अत्यंत समाधान आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *