सौदत्ती येथे गोकुळच्या ठरावधारकांना शपथ देऊन दबाव आणण्याच्या प्रकाराची चौकशी करा

सौदत्ती येथे गोकुळच्या ठरावधारकांना शपथ देऊन दबाव आणण्याच्या प्रकाराची चौकशी करा बेळगावच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावधारक मतदारांना सौंदत्ती येथील देवीच्या भंडाऱ्यावर हात ठेवून शपथ देण्याच्या माध्यमातून भयभीत करून मतदानावर प्रभाव टाकला जाण्याची शक्यता आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्राचार्य डॉ. आनंद मेनसे, सीमा पाटील, माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, राजेश वरक, ईश्वर गायकवाड, ॲड. अभिषेक मिठारी यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रोड येथील निकम कल्याण मंडपम येथे १६ ऑक्टोबर रोजी गोकुळच्या निवडणुकीशी संबंधित ठरावधारक मतदारांना बोलावून शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशिष्ट उमेदवार किंवा पॅनेलच्या बाजूने मतदान करण्यासाठी मतदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता व्यक्त आहे. तसेच शपथ घेण्यास नकार देणाऱ्या मतदारांना मानसिक दबाव किंवा धमकी दिली जाण्याची शक्यताही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.या प्रकरणाची कर्नाटक राज्यातील अमानवी व दुष्ट प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१७ तसेच भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींच्या अनुषंगाने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.संबंधित कार्यक्रमाची सत्यता पडताळून आयोजकांकडून त्याचे स्वरूप व उद्देश यांची माहिती घ्यावी. मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यासाठी धमकी, दबाव किंवा जबरदस्ती केली जात असल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच उपलब्ध सीसीटीव्ही चित्रण, निमंत्रणे, संदेश आणि अन्य पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *