राजे संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसोय; तातडीने वर्गखोल्या उपलब्ध करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची उपायुक्तांकडे मागणी

राजे संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसोय; तातडीने वर्गखोल्या उपलब्ध करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची उपायुक्तांकडे मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : तपोवननगर येथील कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजे संभाजी विद्यालयात वर्गखोल्यांच्या तीव्र कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना वर्गाऐवजी व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका वर्गातील विद्यार्थीसंख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने काही विद्यार्थी वर्गात तर उर्वरित विद्यार्थी व्हरांड्यात बसून शिक्षण घेत आहेत. शिक्षकांनाही वर्गाच्या दारात उभे राहून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी अध्यापन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तातडीने किमान दोन अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याबरोबरच, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत शाळेजवळ महानगरपालिकेने बांधलेले सभागृह तात्पुरत्या स्वरूपात शिक्षणासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
निवेदनात वाढत्या विद्यार्थीसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीचा विस्तार तातडीने मंजूर करावा, विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून शिक्षण घेण्याची वेळ येणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त शिक्षक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून सुरक्षित, प्रशस्त आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाध्यक्षा सौ. रंजना पाटील यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका उपायुक्त किरणकुमार धनवडे यांनी निवेदन स्वीकारून या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.निवेदन देताना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ. रंजना पाटील यांच्यासमवेत कल्पना देसाई, प्राजक्ता आंबले, अनुपमा चव्हाण, कविता कोंडेकर तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *