कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगर विकास मंत्रालय यांनी पुन्हा त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती न्यायालयाला केली आणि पुढील सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने दिनांक ७ सप्टेंबर ही तारीख नक्की केली आहे. सामाजिक जाणीव असलेले विचारवंत उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार, एड सुनीता जाधव, डॉ. तेजस्विनी देसाई यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मार्फत दाखल केलेल्या या जनहित याचिकेतून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे समस्त कोल्हापूरकरांच्या शारीरिक त्रासाबाबत पुराव्यांसह मांडणी करण्यात आलेली आहे.
खरे तर उच्च न्यायालयातील या जनहित याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरु केलेली आहेत. मागील सहा महिन्यांपासून प्रतिवादींतर्फे न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे असा आरोप याचिकाकरते उदय नारकर यांनी केला.
कोल्हापूर शहरातील रस्ते गेली अनेक वर्षे खराब होत चाललेले आहेत परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले जातेय असा आरोप करणाऱ्या या जनहित याचिकेवर कुणीच गंभीर विचार करताना आणि सकारात्मक पावले उचलतांना दिसत नाहीत. कोल्हापूरातील रस्ते पावसामुळे खराब झाल्याचे कारण प्रशासनातर्फे देण्यात येते हा बेजाबदारपणा आहे व रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे असे रसिका पडळकर म्हणाल्या.
सध्या अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी आक्षेपाहार्य आहे त्यामुळे न्यायालय पुढील तारखेला नक्कीच अधिक खोलवर जाऊन सुनावनी करेल असा विश्वास ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला. कोठेही, कशाही पद्धतीने रस्ते उकरायला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटी च्या कामांसाठी उकरलेले रस्ते यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उध्वस्त झालेल्या शहरासारखे भासू लागलेले आहे. सामान्य माणसांना स्पॉडिलायसिस, सर्दी, डोळेदुखी असे आजार होत आहेत. उपननगरातील रस्त्यांबाबत तर यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. रस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन परिस्थितीमुळे, मणक्याचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये प्रचंड वाढ आणि चिखल व धुळीमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. याशिवाय, खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली असून, वाहतूक कोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे सर्व देखील आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे असे कोल्हापूरकरांचे दुःख याचिकेतून मांडण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांचे सहकारी वकील ॲड. श्रीया आवले, ॲड. सकलेन मुजावर म्हणाले.
या जनहित याचिकेतील आरोपांवर उत्तर देण्यासाठी आज महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगर विकास मंत्रालय यांच्या तर्फे पुन्हा अवधी मागून घेतला त्यामुळे पुढील सुनावणी ९ सप्टेंबर ला ठेवण्यात आली.
याचिकेवरील सुनावणी मुद्दाम राखडविणाऱ्या महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचा आज समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने निषेध करण्यात आला. रस्ते कामाकडे प्रशासनाचे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष होतेय, शहरातील रस्ते सुधारण्याबाबत उच्च न्यायालयातील पहिल्या सुनावणीपासून कमालीची बेपर्वाई दिसून येते आहे.उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या मा. न्यायाधीशांनी प्रशासनाला दर पंधरा दिवसांनी कामाच्या प्रगतीचे लेखी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता मात्र, आजतागायत त्या आदेशाची काडीचीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असा उद्वेग आज याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला.
तब्बल आठ महिने उलटून गेले तरी प्रशासनाने एका ओळीचाही अहवाल न्यायालयास सादर केलेला नाही. आता दि. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना हे अहवाल सादर करण्यासाठी ७ सप्टेंबर ही मुदत न्यायालयाने दिली आहे. याचिकेच्या सुनावणीची पुढील तारीख ९ सप्टेंबर आहे.
कोल्हापूरच्या रस्त्यांबाबत महापालिकेच्या बेफिकिरीचे धिंडवडे रोज वृत्तपत्रे आणि माध्यमांतून निघत आहेत. कोल्हापूरचे रस्ते उत्तम आहेत, अशा विधानावर प्रशासनाचा खरोखरच विश्वास बसत असेल, तर नागरिकांनी या प्रशासनास जाग आणण्यासाठी कृतिशील व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत असे उदय नारकर म्हणाले. शहरातील रस्त्यांबाबत जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे. हे महापालिकेने गांभीर्याने घेत तातडीने सर्व रस्ते उत्तम दर्जाचे करण्याचे संविधानदत्त काम हाती घ्यावे. अन्यथा, न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा जाहीर इशारा आम्ही देत आहोत असे याचिकाकर्त्यांनी जाहीर केले आहे.

