“मुलगी नकोच” घाणेरडा खेळ उघड ! बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल तालुक्यातील बिद्री येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचा काळाबाजारांचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.श्रध्दा हॉस्पिटलवर टाकलेल्या धाडीत डॉ.युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
गर्भलिंग तपासणी करून स्त्री भ्रुणहत्या करण्याचा घृणास्पद प्रकार या हॉस्पिटलमध्ये सुरु असल्याच्या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानूसार सहाय्यक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या पथकाने सापळा रचला.आणि चार महिन्याच्या गरोदर महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आले.यावेळी एजंटने २२ हजार रुपयात ‘काम’ करून देण्याची तयारी दर्शवली.खात्री होताच २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता पोलिसांनी थेट हॉस्पिटलवर धाड टाकली.
या धाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन,गर्भपातासाठी वापरत असलेल्या गोळ्या, जेल असलेली बॉटल, महत्वाची कागदपत्रे,रजिस्टर,मोबाईल, साडे बारा लाखांची रोकड आणि टोयाटो फॉर्च्यूनर गाडी असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरवर ह्यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार ,उपविभागीय पोलिस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण,इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पोरे,पोलिस भैरीनाथ जाधव , अनिल पाटील,महिला पोलिस बबीता नलवडे,युंगधरा शेळकेसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अंमदार सुरेश पाटील,रुपेश माने आणि विनोद कांबळे यांनी केली.

