Tuesday, March 11, 2025
spot_img
Homeदेशशक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला एक इंचही जमीन देणार नसल्याची शपथ घेत कोल्हापुरातून एल्गार पुकारला होता.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शिवला होता. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वात लागल्याने सत्ताधारी हादरले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला आमदारांचे समर्थन आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांचे समर्थन आहे हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांनी एकाही शेतकऱ्याशी चर्चा केली नसल्याचा दावा समितीने केला आहे.

चौकट

शेतकरी का चिडले
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. परंतु, आता या शक्तिपीठ महामार्गावरून १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १२ मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट

शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा शक्तीपीठ महामार्ग जोडला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या भागातील शेतकऱ्यांना महामार्ग नको तर पाणी हवे आहे. सरकार मात्र, उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी या महामार्गाचा घाट घालत असल्याचा आरोप होत आहे.

चौकट

८६ हजार कोटी खर्च
नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ८६ हजार कोटी इतका येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments