शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून तपोवन मैदानाची पाहणी
कोल्हापूर दि. १२ : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १३ जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. या उपक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ७५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे उद्दिष्ठ आहे. याकरिता जिल्ह्यातील १२ तालुक्यातून लाभार्थी यांच्यासह शिवसेना – भाजप युतीचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने सभेला उपस्थित राहणार असून, ही सभा “न भूतो न भविष्यति” अशा पद्धतीची होईल. सभेची संपूर्ण तयारी झाली असून, सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभा स्थळाची पाहणी करत, सुरु असलेल्या जय्यत तयारीचा आढावा घेतला. यासह आवश्यक सूचना प्रशासनास दिल्या.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, पूर्वी योजना कागदावरच असायच्या त्याच्या प्रत्यक्ष लाभ फार कमी लाभार्थ्यांना मिळत होता. त्यामुळे योजना असूनही त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी होती. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- भाजप युती शासन प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या दारात जात आहे. राज्य शासनाने कागदावरच्या योजना सत्यात उतरविल्या आहेत. लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी शासनाच्या साथीला शिवसैनिकांची फौज उभी आहे. त्यामुळे शासनाने ठरविलेला लाभार्थ्यांचे उद्धिष्ठ दृष्ठीक्षेपाता आहे. शासनाचा या उपक्रमामागील हेतू चांगला आहे. याकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहून गोरगरीब जनतेला योजनेचा फायदा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु टीका करणे हे विरोधकांच कामच आहे. विरोधक आजपर्यंत सत्तेत असताना अशा पद्धतीचे लोकोपयोगी काम करण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून बिनबुडाच्या टीका होत आहेत. विरोधकांनीही हा उपक्रम सामाजिक आणि लोकांना न्याय देणारा असल्याचे स्विकारून यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, युवा सेना लोकसभा अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, प्रा.शिवाजीराव पाटील, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, उपशहरप्रमुख सुरेश माने, जिल्हा युवा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, सचिन क्षीरसागर, राजू कदम, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषी स्वागत करू : श्री.राजेश क्षीरसागर
मे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित कोल्हापूर शहरात जाहीर सभा घेत आहेत. ही आम्हा शिवसेना – भाजप युतीच्या कार्यकर्त्यांसाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आपल्या लाडक्या नेतृत्वाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहरभर, विमानतळ ते सभा मार्गावर आणि सभा स्थळावर स्वागत फलक, कमानी, भगवे झेंडे आदीद्वारे जोरदार तयारी करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागातून शिवसैनिक दुचाकी व चारचाकी रॅलीद्वारे सभेत सहभागी होणार आहे. शहरातील प्रत्येक विभागातून स्वतंत्र रॅली काढून सभा स्थळी शिवसैनिक दाखल होणार आहेत. यासभेकरिता जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ व माहिती घ्यावी, असे आवाहन श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.