कोल्हापूरच्या विविध समस्यांवर अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार जयश्री जाधव
१२५ तारांकित, २६ लक्षवेधी, १२ अशासकीय ठराव, ७ औचितेच्या मुद्द्यातून शहराच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराची हद्द वाढ, शाहू मिलच्या जागेत शाहू स्मारक, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव व क्रीडांगणाचा विकास, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र, सीपीआर रुग्णालय, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसह कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनात १२५ तारांकित व २६ लक्षवेधी उपस्थित केल्याची माहिती आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ गेल्या पन्नास वर्षापासून रखडली आहे. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासावर मर्यादा येत आहेत. हद्दवाढीसाठी कृती समितीच्या माध्यमातून जनआंदोलन सुरू आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, याकरिता अधिवेशनात लक्षवेधी व तारांकित प्रश्न उपस्थित केला असून, हद्दवाढीसाठी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
शाहू मिलच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू स्मारक व्हावे यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. महापालिकेने याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला आहे. या स्मारकासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकर निधी मिळावा अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे. कोल्हापूर शहरातील प्राथमिक सुविधांसाठी नगरोत्थान योजनेतून विविध प्रस्ताव सादर केले आहेत. ते शासन स्तरावरती प्रलंबित असून त्यासाठी निधी मिळावा. महापुराच्या काळात शहराचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी दुधाळी, नागाळा पार्क व बापट कॅम्प या तीन सब स्टेशनची उंची वाढावी असा प्रस्ताव शासन स्तरावरती प्रलंबित आहे यासाठी त्वरित निधी मिळावा. कोल्हापूरचे नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणारा रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे, त्या प्रस्तावस मंजुरी मिळून त्वरित निधी मिळावा. तसेच कोटीतीर्थ तलावाच्या संवर्धन करावे. गांधी मैदान, बावडा पॅव्हेलियन, दुधाळी पॅवेलियन व ऐतिहासिक खासबाग मैदानाचा सर्वांगीण विकास व्हावा, कोल्हापूर शहरातील उद्यानांची दुरावस्था झाली असून उद्यानाच्या सर्वांगीण विकास व्हावा, शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी निधी मंजूर असून तो अद्याप मिळालेला नाही, महालक्ष्मी तीर्थ आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृहाची दुरुस्ती, शहराच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, शहरात महिलांकरता स्वतंत्र स्वच्छता गृहाची उभारणी, अत्याधुनिक जलतरण तलाव, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) व सावित्रीबाई फुले रुग्णालय यांचे प्रलंबित प्रस्ताव, आयटी पार्क, परिख पुलाचे विस्तारीकरण, एसटी स्टँड ते राजारामपुरी या मार्गावरील रेल्वे फटका वरील पादचारी उड्डाणपूल, वीज दरवाढ, महिला सक्षमीकरण, महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था, कोल्हापूर शहरामध्ये पोलीस आयुक्तालयाची स्थापना, पंचगंगा स्मशानभूमीतील दुरावस्था, आधी समस्यांकडे अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.
शहरातील ड्रेनेज लाईन बदलण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यासाठी निधी मिळून शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा. तसेच शहरातील गटारे, चॅनेल, नाले समस्यांबाबत अधिवेशनात लक्षवेधी केल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.गेल्या काही वर्षांत शहरातील वाहतूककोंडीची समस्या भीषण बनत चालली आहे. या कोंडीचा नागरिकांना रोजच त्रास होत आहे. वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणी अनेक अपघातांत हकनाक बळी गेले आहेत. जिथे जास्तीत जास्त कोंडी होते, अशा अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हर उभारण्यात यावेत, या प्रश्नाकडे अधिवेशनात लक्ष वेधल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
कोल्हापूर जनतेचे व राज्यातील हिताचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी, कष्टकरी, अपंग, निराधार, कामगार व गोरगरीब सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व त्यांच्या मूलभूत हक्कांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्या बाबत सरकारला निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून, कोल्हापूरच्या जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी सांगितले.