वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी कार्यरत रहा – डॉ. दिनकर एम. साळुंके यांचे आवाहन
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ उत्साहात – शाहीद परवीन, वसंत भोसले यांचा डी.लिट. ने सन्मान
कोल्हापूर/प्रतिनिधी :
भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखली जात असून औषध निर्मितीच्या बाबतीत आपण तिसर्या क्रमांकावर आहे. वैदयकीय सेवा व लस निर्मितीच्या क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली आहे, हे सर्व सातत्यपूर्ण संशोधानामुळेच शक्य झाले आहे. आरोग्य क्षेत्रात आणखी वेगाने संशोधनाची गरज असून यासाठी वैदयकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यानी संशोधनाकडे वळावे असे आवाहन नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ दिनकर एम. साळुंखे यांनी केले. कोल्हापूर येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात भव्य शोभायात्रेने दिक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ वेदप्रकाश मिश्रा, मुबई विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ विजय खोले, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या समारंभात ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त शाहीदा प्रवीण गांगुली यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले तर डॉ. नवनाथ पडळकर यांना एक्सलन्स इन रिसर्च म्हणून सन्मानित करण्यात आले.
सतत संशोधन हवे
यावेळी बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, औषधाचा शोध व निर्मिती ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अनेक रोगांवर आपण प्रभावी औषधे तयार केली असली तरी असे काही रोग आहेत ज्यावर अदयाप ठोस उपाय सापडलेला नाही. ९०% औषधे विकासाच्या नंतरच्या टप्प्यात अयशस्वी होतात. त्यामुळे या क्षेत्रात सतत संशोधन होणे गरजेचे असून यात आपल्या सारख्या पदविधरांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. युनायटेड नेशन्सने २०१५ मध्ये शाश्वत विकासाठी चांगल्या आरोग्य सुविधा आवश्यक असून त्यसाठी २०३० चे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी भारतही वचनबद्ध आहे. मात्र १४० कोटी लोकसंख्येला पुरेसे ठरतील एवढे डॉक्टर आजही उपलब्ध नाहीत आपल्या आरोग्य व्यवस्थेतील समस्या सोडवण्याची बौद्धिक क्षमता आणि उत्तम व्यावहारिक ज्ञान भारताकडे आहे.संशोधनात सक्रियपणे गुंतलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना सध्या मोठी मागणी आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि ज्ञानाचा आरोग्य संशोधनाला खूप फायदा होऊ शकतो. येथे उपस्थित विद्यार्थ्यांपैकी काहींनी संशोधन करिअर म्हणून निवडले तर मोठे सामजिक कार्यही करता येईल.
लस निर्मितीत भारत अग्रेसर
लस निर्मिती क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. भारताने उत्पादित केलेल्या लसींची जगभरात निर्यात केली जाते. जागतिक स्तरावर पुरवल्या जाणार्या एकूण लसींपैकी ६०% लसींचा वाटा फक्त भारताचा आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात भारताच्या लस निर्मितीच्या पराक्रमाचे जग साक्षीदार आहे. स्थानिक पातळीवर आणि जलद गतीने लस तयार करण्याच्या क्षमतेमुळेच आपण साथीच्या रोगाचा सामना करू शकलो. डिसेंबर २०२२ पर्यंत, भारतात कोविड-१९ लसीकरणाचे २.२ अब्ज डोस देण्यात आले. भारतातील शास्त्रज्ञांनी बनवलेल्या कोविड लसींनी १५० हून अधिक देशांना मदत झाली. कोविड १९ मुळे भारतात ४.५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु त्यानंतर, प्रभावी लसीकरणामुळे किमान ४५ लाख मृत्यू टाळता आले. विक्रमी वेळेत १००कोटी लोकांना कोविड-१९विरुद्ध लसीकरण करून भारताने एक मोठा विक्रम केला असून हे सर्व संशोधानामुळेच शक्य झाले आहे. ज्यांना आज पदव्या पुरस्कार मिळणार आहेत ते सर्वजण भारताची गुंतवणूक आहेत. महत्वाकांक्षी आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीतील आपण सर्वजण प्रमुख खेळाडू आहात. तुमचे शोध, ज्ञान याचा जास्तीत जास्त फायदा समाजाला होईल यासाठी कार्यरत रहा. जेथे जाल तेथे उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन डॉ. साळुंखे यानी विद्यार्थ्यांना केले.
कुलगरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकाना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती दिली. आरोग्यसेवेत पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, अनुभव याचा उपयोग देशउभारणीसाठी करावा असे आवाहन केले.लोकमतचे संपादक वसंत भोसले म्हणाले, प्रसार माध्यमे आणि पोलिस यांच्याबद्दल लोक चांगले बोलत नाहीत, अशा परिस्थितीत या दोन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने डी. लिट दिली ही कृतज्ञता आहे. खळबळजनक बातम्या देण्याच्या प्रयत्नात माध्यमांवरचा विश्वास डळमळतो आहे. राजकीय नेते आणि माध्यमातील व्यक्तीपण याला कारणीभूत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मिडियाच्या तुलनेत गेल्या ३५ वर्षात मुद्रित माध्यमांनी जपलेली विश्वासार्हता अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुलांना कशापध्दतीने शिकवायचे याचे उदाहरण संजय आणि सतेज पाटील यांना त्यांच्या आईसाहेबांकडून मिळाले. माझ्या आईच्या पाठबळावर आम्हा भावंडांना शिकायला मिळाले. कोल्हापूरने मला खूप दिले. शाहूंच्या विचाराचा आज मी वाहक झालो, ते कोल्हापूरमुळे.जम्मू काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन गांगुली म्हणाल्या, या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मला योग्य समजले गेले, हे मी माझे भाग्य समजते. विविध पदवी घेतलेल्या स्नातकांच्या यशात मी सहभागी झाले. हे सर्वजण भविष्यातील त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील, त्याबद्दल मला आत्मविश्वास आहे.आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असे आवाहन शाहीदा परवीन गांगुली यांनी केले.डॉ वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, आज डी लीट ने सन्मानित केलेल्या शाहीदा परवीन गांगुली व ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले हे दोघेही रियल रोल मॉडेल आहेत. ज्यांचा हात डोक्यावर घ्यावा, किंवा ज्यांच्या पायावर डोके ठेवावे असे फार कमी लोक आहेत. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान डी वाय पाटील विद्यापीठ करत आहे हे खूप कौतुकास्पद आहे.
पन्हाळकर बाईंचा विशेष सत्कार
डॉ संजय डी पाटील आणि सतेज पाटील यांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा ज्या गणेश विद्यालयातून झाला. त्या विद्यालयाच्या पहिल्या शिक्षिका सुलभा पन्हाळकर बाई यांचा डी वाय पाटील ग्रुपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सौ. शांतादेवी डी पाटील अर्थात आईसाहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सौ शांतादेवी डी पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील,वृषाली पृथ्वीराज पाटील, श्री मेघराज काकडे, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुचीत्राराणी राठोड, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्यासह गुपच्या विविध संस्थंचे प्राचार्य, विभागप्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५२० विद्यार्थ्याना पदवी
१५२ विद्यर्थ्याना एमबीबीएस, १४ जणांना पीएच.डी, २६ जणांना एमडी, १८ एम.एस., ८ विद्यार्थ्यांना फेलोशिप, ९३ बी.एस्सी नर्सिंग, २3 पोस्ट बेसिक नर्सिंग, १५ एमएससी नर्सिंग, 25 बी.एससी होस्पिटलिटी, 3 एम.एस्सी. स्टेम सेल, ११ एम.एस्सी. मेडीकल फिजिक्स, १० एम.एस्सी. मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, ९५ पीजीडीएमएलटी, २१ ओटी टेक्निशियन आणि ६ डायलेसीस टेक्निशियन पदवी व पदविका यावेळी प्रदान करण्यात आल्या.
१० जणांना सुवर्ण पदक
अंकुर जैन (एमबीबीएस), योगीता पाटील (बी.एस्सी नर्सिंग), उपासना कदम (पी.बी. बी.एस्सी नर्सिंग), रश्मी एन. एस. (एम.डी.), अश्विन लोकापूर (एम.एस.), विजयपाल कटला (एम.डी-मेडिसिन), सेजल राणे, दिया मोरे, रित्विक राय, या ९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. तर डॉ. नवनाथ शंकर पडळकर यांचा एक्सलन्स इन रिसर्च अवार्डने सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन डॉ देवव्रत हर्षे, डॉ निवेदिता पाटील यांनी केले.