लाच घेणार नाही लाच देणार नाही
प्रामाणिक आणि पारदर्शीपणे काम करेन
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन, अशी सत्यनिष्ठा प्रतिज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी आज घेतली.*
आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी या प्रतिज्ञेसह राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, तहसिलदार अर्चना शेटे, संतोष कणसे, रंजना बिचकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आदीसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, सर्व व्यक्ती चांगल्या असतात. एखाद्याचीच प्रवृत्ती मोहाला बळी पडते आणि त्यामुळे त्या विभागाला दोष येतो. कोणत्याही आमिषाला अथवा मोहाला अजिबात बळी पडू नका. प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे आपली कार्ये पार पाडा. घेतलेली प्रतिज्ञा अंमलात आणा, असे मार्गर्शन त्यांनी केले.
सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
आपल्या देशाची आर्थिक, राजनितीक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे, असा माझा विश्वास आहे. या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्व भागधारक जसे की, सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्रातील यांनी एकत्रित येवून काम करण्याची आवश्यकता आहे. यावर माझा विश्वास आहे.
प्रत्येक नागरिकाने सावध रहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकाबाबत वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरूध्दच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे.
अंतत: मी शपथ घेतो की,
जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईल.