रंकाळा, लक्षतीर्थ तलावांच्या पाण्याच्या संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी रु.२० कोटी निधी मंजुरीची दाट शक्यता
आज दुपारी ४.०० वाजता मंत्रालय स्तरावर बैठक, श्री.राजेश क्षीरसागर यांचा पाठपुरावा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी सह रंकाळा व शहरातील इतर प्रमुख तलावांच्या पाण्यावर होवून प्रदुषणात वाढ होत आहे. याबाबत दि.१८ नोव्हेंबर, २०२२ रोजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली रंकाळ्यासह इतर जलसाठांची प्रदूषण मुक्तीच्या प्रश्नाबाबत शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील तलावांच्या पाण्याच्या संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी अमृत योजनेतून आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
याअनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने प्राधान्याने रंकाळा व लक्षतीर्थ तलावांच्या पाण्याच्या संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी रु.२० कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. यामध्ये रंकाळा तलावासाठी रु.११.९९ कोटी आणि लक्षतीर्थ तलावासाठी रु.४.६५ कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार कॉऊनॉमिकस तंत्रज्ञांनाचा वापर करून सदर तलावातील पाण्यात विशेष प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या रसायनांचा वापर करून पाण्याच्या प्रदुषणास कारणीभूत जिवाणूंचा नाश करून पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज दि.२४ जानेवारी, २०२३ रोजी नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडणार असून, यामध्ये या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, नगरविकास विभागाचे सचिव, कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी उपस्थित राहणार आहेत.