लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : १ जानेवारी रोजी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या लव जिहाद विरोधी जन आक्रोश मोर्चाला कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाचा पाठिंबा राहील, पण हा मोर्चा लव जिहाद विरोधी जन आक्रोश मोर्चा असावा, मुस्लिम समुदाय विरोधात नसावा, असे आवाहन कोल्हापुरातील मुस्लिम समाजाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. या पत्रकात म्हटल्यानुसार लव जिहाद चा कोल्हापुरातील कोणताही मुस्लिम बांधव समर्थन करणार नाही. लव जिहाद, जबरद्स्तीचे धर्मांतरण या गोष्टी इस्लामात सुद्धा अस्तित्वात नाहीत. ही विषवल्ली ठेचून काढलीच पाहिजे. प्रत्येक जाती धर्माच्या महिलांचे मानसन्मान व संरक्षण झालेच पाहिजे, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हिंदू- मुस्लिम समाजातील एकोपा आणि सामाजिक सलोखा संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या लव जिहाद विरोधी जनआक्रोश मोर्चाला कोल्हापूरच्या समस्त मुस्लिम समाजाचा पाठिंबाच असेल, पण या मोर्चाचे आयोजन करताना मुस्लिम समुदाय विरोधात कोणतीही भूमिका संयोजकांच्या वतीने घेतली जाऊ नये, असे आवाहन हाजी अस्लम सय्यद यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.