निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिराला ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र दर्जा – आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिरा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. १९८० च्या दरम्यान स्थापन झालेल्या या मंदिरात नृसिंह सरस्वती जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते.त्यानिमित्ताने सात दिवस पारायण व त्यानंतर महाप्रसाद होतो. या उत्सवाला सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नृसिह सरस्वती दत्तभक्त उपस्थित असतात. मंदिर ट्रस्टकडून वाचन चळवळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सभागृहासाठी निधी देण्याचे जाहीर केला आहे. या मंदिराला ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्य निकष समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.या समितीने जिल्ह्यातील १२ मंदिर स्थळांना ग्रामीण ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील बालिंगा येथील महादेव मंदिराला ‘ ब ‘ वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी माजी मंत्री आ सतेज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला यश आले.