पावसामुळे साचणार्या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा – आमदार जयश्री जाधव यांच्या महापालिका प्रशासनास सुचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : मुक्त सैनिक वसाहत तसेच लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीम नगर, नारायण हौसींग सोसायटी परिसरात अतिवृष्टीमुळे साचणार्या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिली.पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, ड्रेनेज सफाई करूनही, पाणी का साचून राहते असा सवालही आमदार जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.
आमदार जयश्री जाधव यांनी आज महापालिकेत प्रशासक बलकवडे यांची भेट घेतली व उपनगरात पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचून दाखवत, त्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी सूचना दिली.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली होती, तेव्हा पावसाचे पाणी या भागात साचून राहणार नाही व पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना दिली होती. मात्र, त्यानंतर ही प्रशासनाकडून योग्य काम झाले नसल्याचे दिसून येत आहे. कालच्या पावसाने या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहील्याची तक्रार नागरिकांच्याकडून होत आहे. हे सांडपाणी का साचून राहत आहे याचा शोध घ्यावा आणि त्याचे निर्गतीकरण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याची त्वरित अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने करावी.
पावसाच्या पाण्याचे निर्गतीकरण होत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी व सांडपाणी थेट घरामध्ये येत आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सांडपाणी साचून राहिल्याने भागातील रस्ते लवकर खराब होत आहेत, तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी केली. तसेच प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच सांडपाणी साचून राहत असल्याचा आरोप मुल्लाणी यांनी केला.या भागातील सांडपाण्याची निर्गतीकरण करण्यासाठी ज्या उपाययोजना करावी लागतात, त्या त्वरित कराव्यात. पुन्हा नागरिकांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अशी सक्त सूचना आमदार जाधव यांनी यावेळी केली.
पावसाचे पाणी साचून राहणार नाही व नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. याबाबत महापालिका प्रशासन त्वरित कारवाई करेल असे आश्वासन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिले.यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ, आरोग्य अधिकारी विजय पाटील, इस्टेट विभागाचे सचिन जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सचिन घोरपडे, स्वप्निल कांबळे, आप्पा कांबळे, सुशील कालगे, उदय फाळके, डी. एम. कोठावळे, अब्दुल मुल्ला, अलीफ फरास, सुभाष सावंत, भूषण कळंत्रे, भागेश इंगवले, रणजित सिंह, जमीलखान पठाण आदी उपस्थित होते.