लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या सोबत, मात्र अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करावं – माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : ज्या ठिकाणी गरज लागेल, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. मात्र पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करावं. अशा सूचना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते.
पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व आमदारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार पी. एन.पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांनी, आरोग्य विभाग, पाटबंधारे, महावितरण, जलसंपदा, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याकडून पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे रस्ते त्याचबरोबर शहरातील रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग यावर पावसामुळे खड्डे पडतात. परिणामी हे खड्डे मुजविण्याकरीता निधीचे प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवा अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. पूर क्षेत्रातील गावांमध्ये पुरेशा अन्नधान्याची वाहतूक वेळेवर होईल याकडे लक्ष द्या. गावांना जोडणारे पूल सुस्थित ठेवा. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नव्याने पूल बांधणीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा तसच पूर बाधित गावातील जनावरांचे स्थलांतर, चारा छावणी यासंदर्भात योग्य नियोजन करा. अशा सूचना त्यानी सबंधित विभागाला केल्या.
दरम्यान पूर क्षेत्रातील गावांमध्ये देण्यात आलेल्या बोटीच्या नियोजनाचा आढावा घेण्याबरोबरच या बोटीच्या दुरुस्तीसाठी एखाद्या कंपनीसोबत वार्षिक करार करता येतो का. या संदर्भात प्रयत्न करा. अशा सूचनाही माजी मंत्री पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला केल्या. तर अलमट्टी धरणातील विसर्ग बाबत कर्नाटक सरकारशी समनवय राखा, जिल्ह्यातील राधानगरी धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग कसा राहील यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. असंही त्यांनी या बैठकीत सांगितले.दरम्यान, कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्याच्या सूचना आमदार पी.एन. पाटील यांनी केल्या. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी, पूरक्षेत्रामध्ये रबर बोट प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. आमदार राजूबाबा आवळे आणि आमदार जयश्री जाधव यांनी आपल्या मतदार संघातील समस्या मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीच्या अनुषगाने केलेल्या नियोजना संबंधी बैठकीत माहिती दिली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व विभाग प्रमुख,अधिकारी उपस्थित होते.