रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता – आमदार हसन मुश्रीफ यांचे उद्गार
विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज राहण्याचे केले आमदार हसन मुश्रीफ यांनी आवाहन
कागल/प्रतिनिधी : रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.कागलमध्ये कागल, गडहिंग्लज – उत्तुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पावणेतीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याच क्षणी दुसरी शपथ घेतली ती म्हणजे, ग्रामीण महाराष्ट्राचा किंबहुना विकास कामांच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याची. विकास कामांसाठी निधी देण्यामध्ये कसलीही हयगय केली नाही.
एवढी प्रचंड विकासकामे केली आहेत की येणाऱ्या दहा वर्षात कोणतेही काम करावे लागणार नाही.
ते पुढे म्हणाले, गोरगरिबांच्या निराधार योजनेचे काम ही तर आपली पुण्याईची शिदोरीच आहे. तसेच आरोग्य सेवाही अव्यहातपणे सुरूच आहे. कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे कोटकल्याण करणारी योजनाही प्रभावीपणे राबवली, असेही ते म्हणाले.गेल्या पावणेतीन वर्षातील मंत्रिपदाच्या सत्तेच्या माध्यमातून आंबेओहोळ प्रकल्प, नागणवाडी प्रकल्प, उचंगी प्रकल्प, काळम्मावाडी धरणाचे पाणी कालव्यातून थेट कागलच्या श्रीमंत जयसिंगराव तलावात आणणे, सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांचे ऐतिहासिक स्मारक, सुळकुडचा पूल, बसतवडे पूल ही मोठी कामे झाल्याचेही ते म्हणाले.
“माणसा माणसापर्यंत जा….”
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, सत्ता नाही म्हणून रडत बसू नका. विविध कल्याणकारी योजना व कामे घेऊन माणसा -माणसांपर्यंत जा. राजकीय देशातून गोरगरिबांवर अन्याय होत असेल, त्यांची कामे होणार नसतील तर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आपला अधिकार कोणीही काढून घेतलेला नाही. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गोरगरिबांची कामे करण्याची आणि प्रसंगी संघर्षासाठी रस्त्यावर उतरण्याची शपथ घ्या.
“बिळातले विरोधक……”
गेल्या अडीच वर्षातील सत्तेचा संदर्भ देत आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब जनतेची पुण्याई आणि आशीर्वादानेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपदाची लागलेली ही लॉटरी होती. या सत्तेचा विकासकामे आणि जनतेसाठी पुरेपूर उपयोग केला. येणारी दहा ते पंधरा वर्षे गरज पडणार नाही, एवढी प्रचंड विकासकामे केली. आत्ता बिळातले विरोधक बाहेर पडून करतो म्हटले तरी त्यांना करायला कामच शिल्लक नाही, असेही ते म्हणाले. यावेळी कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, दलितमित्र डी. डी. चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर, मनोज फराकटे, वसंतराव धुरे शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रविण भोसले, जगदीश पाटील, सुर्याजी घोरपडे, सुधीर देसाई यांच्यासह कागल, मुरगूड व गडहिंग्लज नगरपरिषदेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.स्वागत कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील – कुरुकलीकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सुत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार संजय चितारी यांनी मानले.