कोल्हापूर महापालिकेने आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत – आमदार जयश्री जाधव
कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक – पूर परिस्थितीचा घेतला आढावा
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेचा प्रत्येक विभाग हा स्वयंपूर्ण असला पाहिजे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासन गतिमान होणे गरजेचे आहे. प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर महापालिकेने आयएसओ मानांकन
मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.कोल्हापूर महापालिकेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाले, कोल्हापूरात २०१९ व २०२१ मध्ये महापूराने हाहाकार उडवला होता. अतिवृष्टी व पुर परिस्थितीमुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या अनुभवाच्या संभाव्य पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे. पूर्व नियोजन असेल तरच प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिकांची तारांबळ टाळता येणे शक्य आहे.कोल्हापूर शहरात डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या आठ दिवसात शहर स्वच्छ झाले पाहिजे. प्रत्येक पाच प्रभागात एक समन्वयक नेमून त्यांच्याकडून स्वच्छतेचा आढावा घ्या. पावसाळ्यात कुठेही कचरा साठून राहिला नाही पाहिजे. तसेच सर्व प्रभागात औषध फवारणी करा. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाची जेटने सफाई करून, औषध फवारणी करा अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.
संभाव्य पूर परिस्थितीमध्ये करावयाचे कामाबाबत अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून, चारही विभागीय कार्यालयात सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, वैद्यकीय विभाग अद्यावत ठेवा पूरपरिस्थितीत लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आताच नियोजन करा अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.
कोल्हापूर महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली.
महापालिकेला आयएसओ मानांकन घेण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा वापर करावा याचे वेळापत्रक निश्चित करा. यासाठी खाजगी सल्लागारांची मदत घेण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी जाधव इंडस्ट्रीज सर्वतोपरी सहकार्य करेल असा शब्द उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी दिला.उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, संदीप घारगे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे,अग्नीशमन दलप्रमुख तानाजी कवाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, लेखापाल संजय सरनाईक आदी उपस्थित होते.