कोल्हापुरात रंगारंग सोहळ्यात ‘इर्सल’ चित्रपटाचे पोस्टर लॉंचये त्या ३ जून रोजी उलगडणार राजकीय ‘इर्सल’
कोल्हापूर/प्रतिनीधी : ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ टॅगलाईन असलेल्या बहुचर्चित ‘इर्सल’ या मराठी चित्रपटाने फर्स्ट लुक पासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत ”इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे. आज कोल्हापुरात या चित्रपटाचे पोस्टर लॉंच करण्यात आले, यावेळी चित्रपटांचे निर्माते विनायक आनंदराव माने, प्रस्तुतकर्ते सूरज डेंगळे, दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार, गीत व संगीतकार दिनकर शिर्के यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
‘इर्सल’ च्या पोस्टरवरून हा एक पॉलिटिकल थ्रीलरपट असल्याचे दिसते. उंच इमारती, झोपडपट्टी, कबुतरांची ढाबळ, कबुतरांच्या पंखांना देखील आग लागलेली दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध माणसे सैरभैर पळताना दिसत आहेत. तसेच चित्रपटातील कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भावमुद्रा यामुळे चित्रपटाच्या कथे बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.
‘इर्सल’ बद्दल बोलताना दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार म्हणाले, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट, नाटकं आली. बर्याचदा त्यातील मांडणी खूप वरच्या स्तरातील असते. ‘इर्सल’ हा सिनेमा एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करतो. प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार जाणूनबुजून किंवा अप्रत्यक्ष या षडयंत्रात कसा गोवला जातो? ते ‘इर्सल’च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हेच या सिनेमाचं वेगळेपण आहे.
‘इर्सल’चे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत. ‘इर्सल’ चित्रपटातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी पदार्पण करत आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.
‘इर्सल’ चित्रपटाला ‘नाद करायचा नाय’ फेम संगीतकार दिनकर शिर्के ‘इर्सल’चे गीत – संगीतकार आहेत. तर नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आहेत. कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची, तर संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित ‘इर्सल’ हा मराठी चित्रपट येत्या ३ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.