भाजप धार्मिक तेढ निर्माण करत आहे – शरद पवार
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काश्मीर फाईल सिनेमावरून पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका आणि वक्तव्य सत्ताधाऱ्यांनी केली आहे. समाज एकसंघ ठेवला पाहिजे, देश पुढे न्यायचा असेल तर माणसा माणसात, जातीजातीत, धर्माधर्मात एकवाक्यता एकसंघता हवी. फूट नको. आपण भारतीय आहोत ही भावना असली पाहिजे. पण आपण भारतीय आहोत ही भावना रुजवण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. देशाच्या दृष्टीने ते घातक आहे असे मत व्यक्त केले आहे. पुढे सांगतानाच त्यांनी गुजरातमध्ये तर यापेक्षा भयाण हिंसा झाली होती. रेल्वेचे डबे पेटवले होते. शेकडो लोकं मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी त्या राज्याचे प्रमुख कधी पुढे आलेले हे आमच्या ऐकिवात नाहीये, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना हल्लाबोल केला आहे. काश्मिर पंडितांवर अत्याचारावर हा सिनेमा काढलाय. पण ही घटना कधी घडली हे पाहिलं पाहिजे. या सिनेमातून अन्य धर्मीयांच्या माणसाबद्दल संताप येईल. शेवटी काही लोकांनी कायदा हातात घ्यावा असं गणित तर करायचं नाही, तसं काही तरी चित्रं दिसतं, असा संशय पवारांनी व्यक्त केला. हा सिनेमा कोणत्या काळातील आहे. काश्मीरमधून पंडित बाहेर पडले. हे घडलं तेव्हा राज्यकर्ते कोण होते? त्यावेळी काँग्रेसचं राज्य होतं असं सांगितलं जातं. पण त्यावेळी व्हीपी सिंग यांचं सरकार होतं. भाजपचा त्यांना पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद भाजपच्या पाठिंब्याने गृहमंत्री होते. त्या ठिकाणी राज्यपाल नेमलं त्या व्यक्तीचं धोरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने योग्य नव्हतं. जेव्हा राज्यपाल नियुक्तीचा प्रश्न आला तेव्हा फारूख अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला आणि ते सत्तेपासून बाजूला गेले. त्यांच्या हातात राज्याची सूत्रं, त्यांची राजवट असताना काश्मीर पंडितांवर हल्ले झाले, असंही शरद पवार म्हणाले.