शेतमजुर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस
– कामगार मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजुर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पोचे वाहनचालक या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि दिशा फौंडेशनमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. मार्केट यार्ड येथे झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चु. श्रीरंगम, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष के. पी. पाटील, दिशा फौंडेशनच्या संस्थापक डॉ. अंजली बोऱ्हाडे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, भैया माने, युवराज पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
कामगार मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, असंघटित क्षेत्रात सुरक्षितता नसल्याने धोके वाढले आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगा सुरक्षित व्हावा यासाठी कामगार विभागामार्फत या कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगारांने आपली नोंदणी करावी व केलेल्या नोंदणीचे नुतनीकरण गरजेचे आहे. एकदा नोंदणी झाली की त्यांना योजनांचा लाभ मिळण्यास सुकर होईल. कामगार मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मर्यादित कामासाठी असणारे बांधकाम मंडळ आता व्यापक झाले असून मंडळाकडे निधीही मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या तपासणीसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. ही व्यवस्था झाल्यानंतर मंडळाकडे अधिकचा उपकर जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपकरातून जमा झालेला निधी केवळ नोंदणी केलेल्या कामगारांच्या कल्याण्यासाठीच वापरण्यात येत असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी आपली नोंदणी करावी. कामगारांच्या नोंदणीसाठी दिशा फौंडेशन पुढे आले असून त्यामुळे नोंदणी करण्यास आता गती येईल. दिशा फौंडेशनने या कामात पुढाकार घेतल्याबद्दल कामगार मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिशा फौंडेशनचे आभार मानले.
मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपली नोंदणी करुन घ्यावी. नोंदणी करण्याच्या कामासाठी दिशा फौंडेशन पुढे आल्याने या कामास आता गती येईल, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीरंगम यांनी यावेळी सांगितले.श्रमिकांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी दिशा फौंडेशनमार्फत काम करण्यात येत असल्याचे फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. बोऱ्हाडे यांनी सांगितले. राज्य शासन बांधकाम कागारांसाठी राबवित असलेल्या योजना लाभदायी असून बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी फौंडेशनला संधी दिल्याबद्दल त्यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले. फौंडेशनमार्फत कमी नोंदणी असलेल्या ठिकाणी प्रभावी काम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात कामगारांना विविध योजनांच्या लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.